विद्यार्थ्यांना 70 टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षेला सामोरे जावे लागणार
प्रतिनिधी / बेळगाव
शालेय जीवनाचा अंतिम टप्पा असणाऱया एसएसएलसी वर्गाला प्रारंभ झाल्याने समाधान व्यक्त होत असताना अभ्यासक्रमाबाबतचे चित्रदेखील स्पष्ट करण्यात आले आहे. 2020-2021 या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमात 30 टक्के कपात करण्यात आली असून याबाबतचा अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. यामुळे यंदा दहावीचे विद्यार्थी 70 टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षेला सामोरे जाणार आहेत. अभ्यासक्रमात किमान 40 ते 50 टक्के कपात होण्याची शक्यता व्यक्त होत असताना शिक्षण विभागाने 30 टक्के कपात जाहीर केल्याने अभ्यासक्रमाबाबतचे सविस्तर चित्र स्पष्ट झाले आहे.
कोरोनाच्या संकटात विलंबाने म्हणजेच 1 जानेवारीपासून ऑफलाईन दहावीच्या वर्गाला सुरुवात करण्यात आली. यामुळे जानेवारीपासून परीक्षेपर्यंतचा काळ म्हणजे कामकाजाचे 120 दिवस विचारात घेत 30 टक्के कपात करण्यात आली आहे. यामुळे 8 वी व 9 वी इयत्तेत झालेल्या घटकांना वगळण्यात आले आहे. शिवाय घटकाची काठीण्य पातळी, घटकांचे पाठय़क्रमातील स्थान, उपघटकाचे स्थान याबाबतचा सविस्तर विचार करून पाठय़क्रम वगळण्यात आला आहे. यामुळे विषयनिहाय अभ्यासक्रमाचे चित्र अखेर स्पष्ट झाले आहे.
अभ्यासक्रमाचा मार्ग मोकळा
दहावीचे वर्ग सुरू होऊन 15 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याच्या दृष्टीने करण्यात आलेली अभ्यासक्रमातील कपात फायद्याची आहे. ऑनलाईन वर्ग, विद्यागमच्या माध्यमातून काही पाठय़क्रम पूर्ण करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्ष कामकाजाचे 120 दिवस असेच चित्र समोर ठेवत अभ्यासक्रम कमी केला आहे. विषयनिहाय वगळण्यात आलेल्या अभ्यासक्रमाचा परीक्षेसाठी विचार करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. इ. आठवी व नववीमध्ये जो पाठ विद्यार्थी शिकले आहेत, त्याची पुनरावृत्ती असणारे दहावीतील पाठ प्रामुख्याने वगळण्यात आले आहेत.
अभ्यासक्रमातील कपातीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीवर कोणताही परिणाम होणार नाही. परीक्षेच्या वाटचालीच्या दृष्टीने लवकरात लवकर अभ्यासक्रम स्पष्ट करण्याची मागणी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. यामुळे या निर्णयाबाबत समाधान व्यक्त होत आहे.
दहावी परीक्षेच्या दृष्टीने हा निर्णय लाभदायक ठरणार- शिक्षणाधिकारी आण्णाप्पा पॅटी
घटकांची पूर्वीच्या इयत्तेत झालेली पुनरावृत्ती शिवाय पाठय़क्रमातील स्थान व कामकाजाचे दिवस, परीक्षेतील स्थान याचा विचार करून 30 टक्के कपात करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश जाहीर करत कोणता भाग का वगळला आहे, शिवाय विषयनिहाय चित्र देखील स्पष्ट झाले आहे. यामुळे दहावी इयत्तेला परीक्षेच्या दृष्टीने हा निर्णय लाभदायक ठरणार असल्याचे मत आण्णाप्पा पॅटी यांनी व्यक्त केले









