-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून पुरवणी परीक्षेबद्दल कोणत्याही सूचना नाही
प्रतिनिधी/कोल्हापूर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या www.mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर 29 जुलै रोजी जाहीर झाला होता. दहावीच्या मूळ गुणपत्रकाचे वाटप सोमवार 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता प्रत्येक शाळांना करण्यात येणार आहे. गुणपत्रकाबरोबर शाळेच्या निकालाचा अहवाल शाळेला देण्यात येणार आहे. तर दुपारी 3 वाजता त्या त्या शाळेत विद्यार्थ्यांना गुणपत्रकाचे वाटप करण्यात येणार आहे. जवळपास सर्वच शाळांकडून शाळा सोडल्याचा दाखलाही देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी शाळेत फेऱया माराव्या लागणार नाहीत. पण अद्याप पुरवणी परीक्षेबद्दल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याकडून सूचना देण्यात आलेल्या नाहीत.








