ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अशातच आता अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाणार असून दहावीचा निकाल जून अखेरपर्यंत लावला जाणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली. यावेळी त्या म्हणल्या, दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मूल्यमापन होणार आहे.
पुढे त्या म्हणल्या, कोविड-19 चा प्रादुर्भाव मार्च 2021पासून राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत गेल्याने उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे दहावी परीक्षेसाठी प्रविष्ट विद्यार्थी, पालक, परीक्षेसंदर्भात काम करणारे घटक या सर्वांचे आरोग्य ही प्राथमिकता ठेवून राज्य मंडळातर्फे आयोजित इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यानुसार राज्य शासनाने शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये दहावी परीक्षेसाठी प्रविष्ठ असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्याबाबत परवानगी दिली आहे.
यामध्ये, इयत्ता नववी व इयत्ता दहावीसाठी सुधारित मूल्यामापन योजोना शासन निर्णय दि. 8 ऑगस्ट 2020 नुसार मूल्यमापन योजना निश्चित करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष 2020-22 साठी इयत्ता दहावी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांच्या आधारे निश्चित करण्यात येईल.
विद्यार्थ्यांचे दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन 30 गुण
विद्यार्थ्यांचे दहावीचे गृहपाठ तोंडी परीक्षा/ प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन 20 गुण
विद्यार्थ्यांचा नववीचा विषयनिहाय अंतिम निकाल 50 गुण याप्रमाणे विषयनिहाय एकूण 100 गुण (नववी संपादणूक यासाठी 50 टक्के भारांश आणि दहावी संपादणूक यासाठी 50 टक्के भारांश)
दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना वरील पद्धतीने तयार केलेला निकाल समाधानकारक वाटत नसेल त्यांना कोविड-19 ची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेअंतर्गत यापुढील लगतच्या दोन परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध असेल.
शाळास्तरावर गैरप्रकार अथवा अभिलेख यामध्ये फेरफार झाल्यास शिस्तभंग व दंडात्मक कारवाई याची तरतूद करण्यात आली आहे.
11 वीच्या परीक्षेसाठी वैकल्पिक प्रवेश परीक्षा
इयत्ता 11 वीच्या प्रवेशाबाबत ऑप्शनल सीईटी घेण्यात येणार आहे. या प्रवेश परीक्षा राज्य मंंडळाच्या दहावी अभ्यासक्रमावर असेल. त्यासाठी दोन तासाचा वेळ, ओएलआर स्वरुप असेल. या 11 वी प्रवेश सामाईक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.








