वृत्तसंस्था/ मुंबई
व्यवहाराच्या तुलनेत पाहता मागच्या आठवडय़ात बाजारात चढउतार दिसून आला. 11 आठवडय़ापासून सुरू असलेल्या तेजीला अखेर बेक लागला. या दरम्यान सेन्सेक्स पहिल्यांदाच 50 हजाराचा टप्पा ओलांडू शकला. बाजार भांडवलाचा विचार करता देशातील 10 आघाडीवरच्या कंपन्यांपैकी 4 कंपन्यांचे बाजारमूल्य मागच्या आठवडय़ात 1.15 लाख कोटींनी वाढले आहे. यात रिलायन्सच अव्वल ठरली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रिजचे बाजार भांडवल मूल्य सर्वाधिक वधारल्याचे पहायला मिळाले. बाजार भांडवल 71 हजार कोटी रुपयांनी वाढून 12.99 लाख कोटीवर पोहचलं. याखेरीज टीसीएस, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड व बजाज फायनान्स यांच्या बाजार भांडवल रकमेत वाढ झाली आहे.
टीसीएसचे बाजार भांडवल 26.19 हजार कोटींनी वाढून 12.39 लाख कोटीवर पोहोचले आहे. हिंदुस्थान युनिलिव्हरचे मूल्य 13.35 हजार कोटीच्या वाढीसह 5.65 लाख कोटी तर बजाज फायनान्सची मूल्य 5.17 हजार कोटी वाढीसह 2.99 लाख कोटीवर पोहचलं.
प्रमुख बँकांचे भांडवल घसरले
दुसरीकडे एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, भारती एअरटेलचे बाजार भांडवल मूल्य घटले आहे. भारती एअरटेलचे बाजार भांडवल मूल्य 13.99 हजार कोटींनी घटून 3.14 लाख कोटीवर आलं आहे. आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल 6.37 हजार कोटींनी घटून 3.68 लाख कोटीवर आलं आहे.
रिलायन्स पुन्हा अव्वल!
भारतात विविध क्षेत्रात विस्तारलेली रिलायन्स इंडस्ट्रिज बाजार भांडवल मुल्यात पुन्हा आघाडीवर राहिली आहे. यानंतर टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, भारती एअरटेल व बजाज फायनान्स यांचा नंबर लागतो.









