वृत्तसंस्था/ खारतूम
दहशतवादाचे पुरस्कर्ते असलेल्या देशांच्या अमेरिकेच्या यादीतून सूदानचे नाव वगळण्यात आले आहे. खारतूममध्ये अमेरिकेच्या दुतावासाने सोमवारी याची अधिकृत घोषणा केली आहे. अमेरिकन काँग्रेसच्या अधिसूचनेचा 45 दिवसांचा कालावधी संपला असून विदेशमंत्र्यांनी त्यावर स्वाक्षरी केल्याची माहिती दुतावासाकडून देण्यात आली आहे.
सूदानच्या अंतरिम सरकारने मागील महिन्यात अनेक दहशतवादी गटांसोबत शांतता करार केला आहे. या करारांच्या मदतीने कित्येक वर्षांपासून सुरू असलेले गृहयुद्ध समाप्त करण्याचा प्रयत्न आहे. या गृहयुद्धात लाखो लोक मारले गेले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 23 ऑक्टोबर रोजी सूदानला दहशतवादाच्या पुरस्कृर्त्यांच्या यादीतून बाहेर काढणार असल्याची घोषणा केली होती.
सूदान 1993 पासूनच दहशतवादाच्या पुरस्कर्त्या देशांच्या यादीत सामीला आहे. याचबरोबर या यादीत इराण, उत्तर कोरिया आणि सीरियाचे नाव आहे. या यादीत असल्याने सूदानला अनेक प्रकारच्या निर्बंधांना तेंड द्यावे लागले होते. भारताने अमेरिकेच्या नव्या निर्णयाचे स्वागत करत सूदानमध्ये आता लोकशाहीवादी बदल होईल आणि विकास, शांतता तसेच सुरक्षा प्रस्थापित करण्यास मदत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
7 ऑगस्ट 1998 रोजी केनियाच्या नैरौबी, टांझानिया आणि दार-एस-सलाम येथील अमेरिकेच्या दुतावासांमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. यात सुमारे 224 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतरच आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष अल-कायदाच्या दिशेने वेधले गेले होते. एफबीआयने ओसामा बिन लादेनचे नाव 10 मोस्ट वाँटेड फरारांच्या यादीत सामील केले होते. त्या काळात सूदानमध्ये कतान उमर अल-बशीर यांच्याकडे सत्ता होती. लादेनला सूदानमध्येच आश्रय देण्यात आला होता आणि अल-कायदाला तेथून मोठी रसदही प्राप्त झाली होती.









