पुलवामामध्ये चकमक, शस्त्रसाठा जप्त
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा जिल्हय़ातील कामराजीपोरा येथे बुधवारी पहाटे झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले असून एका जवानाला हुतात्मा व्हावे लागले. जवानांनी चकमकीच्या ठिकाणाहून एक एके-47 रायफल, हॅण्डग्रेनेड व अन्य घातपात घडवणारा शस्त्रसाठा देखील हस्तगत केला आहे. जवानांनी सर्व परिसरास वेढा घालून दिवसभर शोधमोहीम राबवली. मात्र, अन्यत्र दहशतवादी कारवाया दिसून आल्या नाहीत. दिवसभर या भागात अतिरिक्त फौज तैनात करण्यात आली होती.
कामराजीपोरा येथे दहशतवाद्यांचे वास्तव्य असल्याची माहिती लष्कराला उपलब्ध झाली होती. या माहितीच्या आधारे बुधवारी पहाटेच्या वेळी जवानांनी दहशतवादी लपलेल्या भागाला घेराव घालून कारवाई सुरू केली. कारवाईचा सुगावा लागताच दहशतवाद्याने स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याने चकमक उडाली. यावेळी झालेल्या संघर्षात एका जवानालाही प्राण गमवावे लागले. या चकमकीत अन्य एक जवान जखमी झाला असून त्याच्यावर लष्करी इस्पितळात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली.