ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरमधील सोपोर परिसरात नाकाबंदी सुरू असताना दहशतवाद्यांनी अचानक केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचे तीन जवान शहीद झाले. तर एक जवान गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली.
CRPF च्या जम्मू-काश्मीर विभागाचे विशेष संचालक झुल्फीकार हसन यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सीआरपीएफच्या पथकाकडून सापोर परिसरात नाकाबंदी सुरू होती. त्याचवेळी दहशतवाद्यांनी अचानक केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचे तीन जवान शहीद झाले. तर एक जवान गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, सीआरपीएफ जवानांनी सापोर परिसरात शोध मोहीम हाती घेतली आहे.
संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत असताना पाकिस्तानला त्याचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसून येते. दोन दिवसांपूर्वीही पाकिस्तानी सैन्याकडून काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये गोळीबार आणि उखळी तोफांचा जोरदार मारा करण्यात आला होता.









