नवी दिल्ली / वृत्तसंस्था
श्रीनगरच्या मेसुमा भागात सोमवारी दुपारी दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात एक सीआरपीएफ जवान हुतात्मा झाला तर जखमी झालेल्या एका जवानावर उपचार सुरू आहेत. हुतात्मा जवानाचे नाव विशाल असे आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण परिसराची नाकाबंदी करून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे. गेल्या 24 तासांत काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेला हा तिसरा हल्ला आहे. यापूर्वी दोन दहशतवादी हल्ल्यांमध्ये बिगर काश्मिरी मजुरांना लक्ष्य करण्यात आले होते.
श्रीनगरच्या मेसुमा भागात दहशतवाद्यांनी तेथे सेवा बजावत असलेल्या सीआरपीएफ जवानांवर अचानक गोळीबार सुरू केला. यामध्ये दोन जवान जखमी झाले. या हल्ल्यानंतर दहशतवादी तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. सुरक्षा दल आणि पोलिसांनी जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सीआरपीएफच्या एका जवानाला डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत जाहीर केले. अन्य एका जवानावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृतीही नियंत्रणात असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
पुलवामात कामगार-वाहनचालक टार्गेट
पुलवामा येथे सोमवारी दुपारी दोन स्थलांतरित मजुरांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही कामगार जखमी झाले. पातलेश्वर कुमार आणि जोको चौधरी अशी त्यांची नावे असून ते बिहारमधील रहिवासी आहेत. यापूर्वी रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हिमाचलचा ट्रकचालक आणि त्याचा सहाय्यक जखमी झाला होता. सुरेंद्र सिंग मुलगा बिशन सिंग आणि सहचालक सुशील दत्त दोघेही हिमाचल प्रदेशातील नूरपूर कांगडा येथील रहिवासी आहेत. दोघांवर श्रीनगरच्या महाराजा हरिसिंह रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पर्यटकांमध्ये भीतीची छाया
बिगरकाश्मिरी लोकांवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दहशतवादी आता अन्य राज्यातील लोकांबरोबरच सुरक्षा दलांना लक्ष्य करत आहेत. या हल्लासत्रादरम्यान काश्मीरमध्ये सध्या मोठय़ा संख्येने पर्यटक दाखल होत असून अशा परिस्थितीत प्रशासनाकडून सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. ठिकठिकाणी नाके लावण्यात आले आहेत, मात्र असे असतानाही काही भागात दहशतवादी आपल्या नापाक कारवाया करून पळून जाण्यात यशस्वी ठरत आहेत. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दल आणि पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. दहशतवाद्यांची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्हीची मदत घेतली जात आहे.









