लष्करप्रमुख नरवणे यांचा इशारा- चीनलाही फटकारले
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
चीन पूर्व लडाख भागात सैन्यबळ वाढवत असल्याने निश्चितच भारताची चिंता वाढली आहे. पण आमचे सैन्यही चोख प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे भारतीय लष्करप्रमुख नरवणे यांनी शनिवारी स्पष्ट केले. चिनी सैन्याने हिवाळय़ातही तैनाती कायम ठेवली तर नियंत्रण रेषेवरील परिस्थिती चिघळू शकते, असेही ते म्हणाले. तसेच दहशतवाद्यांच्या वाढत्या कारवायांबाबत भाष्य करताना त्यांचे डावपेच यशस्वी होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
दहशतवादी पूर्वी सुरक्षा दलांना लक्ष्य करायचे. पण, अलीकडे ते निरपराध लोकांना लक्ष्य करत आहेत. दहशतवादी लोक काश्मीरच्या लोकांना आपले मानत असतील तर ते त्यांना का लक्ष्य करत आहेत? असा प्रश्न भारतीय लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी उपस्थित केला. तसेच ड्रोन हल्ले आणि शेजारच्या देशातील परिस्थितीवरही नरवणे यांनी चिंता व्यक्त केली. चिनी सैन्याने आपली तैनाती सुरू ठेवली तर भारतीय लष्करही सैन्यबळ वाढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही सामायिक क्षेत्रात विकासयोजना राबविण्याचा धडाकाही सुरू करणार आहोत. तसेच आधुनिक शस्त्रे आणि उपकरणांवरही भर देत आहोत. भविष्यात कोणत्याही प्रकारच्या कठीण परिस्थितीला आपण सामोरे जाऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.









