शोपियानमध्ये आणखी चौघांचा खात्मा : 24 तासात तीन कमांडर्ससह 9 जण यमसदनी
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीर येथे दोन वेगवेगळय़ा कारवायांमध्ये एकूण 9 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. रविवारी येथे पाच जणांना कंठस्नान घातल्यानंतर सोमवारी पहाटेपर्यंत त्याच भागात अन्य एका मोठय़ा कारवाईत आणखी चौघांना यमसदनी पाठविण्यात आले. मृतांमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनच्या तीन कमांडर्सचाही समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. शोपियान प्रांतात झालेल्या या चकमकीत सैन्याचे 3 जवानही गंभीर जखमी झाले आहेत.
सोमवारी सकाळी येथे चार दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. दक्षिण काश्मीरमधील पिंजोरा भागामध्ये संरक्षण दल पथकावर गोळीबार करणाऱया या दहशतवाद्यांचा तेथेच खात्मा करण्यात आला. भारतीय सैन्य, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली. गुप्तचर यंत्रणांकडून या भागात दहशतवादी हालचाली सुरू असल्याची अधिकृत माहिती मिळताच संरक्षण यंत्रणांकडून तातडीने कारवाई करण्यात आली. शोपियानमध्ये मध्यरात्रीनंतर सुरू झालेल्या दहशतवादविरोधी कारवाईमध्ये एकूण चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, अशी माहिती विक्टर फोर्सचे जनरल कमांडिंग ऑफिसर मेजर जनरल ए. सेनगुप्ता यांनी दिली.
मध्यरात्रीनंतर मोहिमेला गती
दक्षिण काश्मीरमधील शोपियानच्या पिंजोरा भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने या भागात घेराव व शोधमोहीम राबविली. मध्यरात्रीच गोळीबार आणि चकमकीला सुरुवात झाली होती. यावेळी झालेल्या संघर्षात परिसरातील घरेही दहशतवाद्यांनी लक्ष्य केल्याचे स्पष्ट झाले आहे. सकाळच्या सुमारास घटनास्थळावर चार मृतदेह सापडले. तसेच शस्त्रे आणि दारुगोळाही जप्त करण्यात आला. शोपियान जिल्हय़ातील मागील 24 तासातील ही दुसरी मोठी चकमक ठरली.
चौघांचीही ओळख पटली
चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून तीन एके-47 रायफल, दोन पिस्तूल आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. मृत दहशतवाद्यांची ओळख पटली असून पिंढोरा येथील उमर धोबी, वेहिलचा रहिवासी रईस खान, रीबन येथील सकलैन अमीन आणि रकपोरा कापराण येथील वकील अहमद अशी त्यांची नावे आहेत. जिल्हय़ातील रेबन भागात रविवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनच्या स्वयंघोषित कमांडरसह पाच दहशतवादी ठार झाले होते. अशाप्रकारे सुरक्षा दलांना 24 तासात 9 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे.
अंतर्गत भागातही कारवाया
गेल्या पंधरवडय़ात काश्मीरमध्ये एकूण 9 ठिकाणी दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमकी झडल्या. पुलवामा, कुलगाम, शोपिया आणि अवंतीपोरा येथे झालेल्या चकमकीत 18 जण ठार झाले, तर जम्मूच्या राजौरी पुंछ भागात घुसखोरी करताना तिघांना कंठस्नान घालण्यात आले होते. दहशतवाद्यांविरुद्धच्या या मोहिमेमध्ये लष्कराचे तीन जवानही जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांकडून मोठय़ा प्रमाणात दारूगोळा आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
चालू वर्षात 100 दहशतवादी यमसदनी
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध सुरक्षा दलाचे ‘ऑपरेशन ऑलआऊट’ अभियान सुरू आहे. गेल्या 24 तासात भारतीय लष्कराने काश्मीर खोऱयात 9 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दहशतवाद्यांविरुद्ध रविवारी चालू वर्षातील सर्वात मोठी कारवाई करण्यात आली. त्यात एकाचवेळी पाच दहशतवादी ठार झाले. दोन आठवडय़ात मरण पावलेल्या दहशतवाद्यांचा आकडा 22 झाला असून चालू वर्षात जानेवारीपासून आतापर्यंतच्या 160 दिवसात 100 दहशतवाद्यांना यमसदनी पाठविण्यात आल्याची माहिती जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी दिली. आतापर्यंतच्या चकमकीत 29 सुरक्षा कर्मचाऱयांनाही हुतात्मा व्हावे लागले आहे.









