अमेरिकेकडून अलर्ट : भारताची मोठी कारवाई , दहशतवादी-गँगस्टर्स यांच्यात संगनमत सुरू असल्याचा दावा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेच्या भूमीवर शीख दहशतवाद्यांच्या हत्येच्या कटाशी संबंधित आरोपांची चौकशी करण्यासाठी भारताने उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट अमेरिकन अधिकाऱ्यांनी हाणून पाडला. त्यानंतर या कटात सहभागी असल्याच्या चिंतेबद्दल भारत सरकारला इशारा जारी केला.
भारताने या प्रकरणातील सर्व संबंधित पैलूंवर लक्ष ठेवण्यासाठी 18 नोव्हेंबर रोजी एक उच्चस्तरीय तपास समिती स्थापन केली आहे. पन्नू हा शीख दहशतवादी असून त्याच्याकडे अमेरिका आणि पॅनडाचे नागरिकत्व आहे. भारतीय तपास यंत्रणा विविध दहशतवादाच्या आरोपाखाली त्याचा शोध घेत आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी बुधवारी सांगितले. द्विपक्षीय सुरक्षा सहकार्याबाबत अमेरिकेसोबत झालेल्या चर्चेदरम्यान, अमेरिकेने संघटित गुन्हेगार, शस्त्रधारी हल्लेखोर, दहशतवादी यांच्यातील संबंधासंबंधी काही माहिती सामायिक केली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भारत अशाप्रकारची माहिती गांभीर्याने घेतो कारण ती आमच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या हितांवर परिणाम करते आणि संबंधित विभाग आधीच या प्रकरणाची चौकशी करत आहेत. यासंदर्भात 18 नोव्हेंबर रोजी भारत सरकारने या प्रकरणातील सर्व संबंधित पैलूंवर लक्ष ठेवण्यासाठी एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे, असे प्रवक्त्याने सांगितले. समितीच्या निष्कर्षांच्या आधारे भारत आवश्यक ती कारवाई करेल, असे बागची यांनी सांगितले.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी जूनमध्ये व्हॅकुव्हर उपनगरात खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येमध्ये भारतीय एजंटचा “संभाव्य” सहभाग असल्याचा आरोप केला होता. भारताने ट्रुडो यांचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले होते. मात्र, या घटनेनंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता.









