कृष्णा ढाब्यात दहशतवाद्यांनी मुलाला मारले
पित्याने पुन्हा सुरू केला ढाबा , मुलगा गमाविला, हिंमत नाही
जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये प्रसिद्ध ढाबाचालक रमेश कुमार यांनी मुलाच्या मृत्यूच्या दोन महिन्यांनी पुन्हा ढाबा सुरू केला आहे. मी माझा मुलगा गमावला आहे, हिंमत नाही. आता कुठल्याही गोष्टीची भीती नाही. मी येथेच जन्मलो आणि लहानाचा मोठा झालो असे उद्गार रमेश कुमार यांनी काढले आहेत.
17 फेब्रुवारी रोजी श्रीनगरमधील कृष्णा ढाब्यात रमेश यांचे पुत्र आकाश मेहरा यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळय़ा झाडल्या होत्या. सुमारे 11 दिवसांच्या संघर्षानंतर आकाश मृत्यूसोबतच्या लढय़ात हरला होता.
मुलाला गमावल्यावरही रमेश कुमार यांनी दहशतवाद्यांसमोर मान तुकविण्यास नकार दिला आहे. माझ्या मुलाने येथेच बलिदान केले आहे. हा ढाबा बंद ठेवणे याचा अर्थ त्याच्या आत्म्याला दुःखी करणे असल्याचे रमेश कुमार म्हणाले.
काश्मीरमध्येच आम्ही जन्मलो. ही आमची माती आहे. आमचे घर आहे, कुणीच आम्हाला येथून हाकलू शकत नसल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी तीन दहशतवाद्यांना अटक केली होती. अन्य देशांच्या 24 मुत्सद्यांचे शिष्टमंडळ जम्मू-काश्मीरची स्थिती जाणून घेण्यासाठी दौऱयावर आले असताना हा हल्ला झाला होता.
दहशतवादी हल्ल्यानंतर कृष्णा ढाबा बंद होता. तसेच रमेश कुमार कुटुंबासोबत जम्मूत स्थलांतरित झाले होते. पण रमेश कुमार यांनी पुन्हा एकदा दहशतवादाच्या विरोधात हिंमत दाखवून नवी सुरुवात करत हा ढाबा सुरू केला आहे.









