आघाडीचा मराठी विनोदवीर भाऊ कदम यांचा ‘तरुण भारत’शी संवाद
स्वप्नील वरवडेकर / कणकवली:
‘लहानपणी मुंबईतील कामगार वस्तीमधील बालपण, मोठेपणी चरितार्थासाठी चालविलेली पानटपरी आणि आजचा यशस्वी अभिनेता… हा प्रवास अगदी स्वप्नवत झाला. मलाच नव्हे तर, माझ्या कुटुंबियांनाही हे यश अनपेक्षीत आहे. या प्रवासात माझ्या रसिकांचा मोठा वाटा आहे. अर्थात यशात सातत्य राहील, याची मी सदैव दक्षता घेईन.’ मराठी मनोरंजन विश्वातील हास्यसम्राट अभिनेते तथा सिंधुदुर्गचे (मु. सावडाव, ता. कणकवली) सुपुत्र भाऊ कदम यांचे हे उद्गार आहेत.
सध्या कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या कारणास्तव काहीसा वेळ मिळालेल्या भाऊंना दीर्घ प्रतिक्षेनंतर तेही चक्क कुटुंबियांसह सावडाव गाठण्याची संधी मिळाली आहे. शुक्रवारी कणकवली येथे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या घरी दाखल झालेल्या भाऊ यांनी दै. ‘तरुण भारत’शी मनमोकळय़ा गप्पा मारल्या.
दशावतारामुळेच ऍक्टिंग भावली!
स्वत:मधील अभिनयाचे मूळ शोधताना भाऊ सांगतात, आयुष्य मुंबईत गेले तरी मी मूळ कोकणचा आहे. लहानपणी शाळेला सुट्टी पडली की वडिलांसोबत सावडावला यायचो. त्यावेळी दशावतार बघायचो. अभिनय व खासकरून ‘स्टेज ऍक्टिंग’ तिथेच भावली. पुढे हायस्कूल, कॉलेजमध्ये एकांकिकांच्या माध्यमातून अभिनय केला. स्पर्धांमध्येही सहभाग घेतला. तरिही अभिनेता बनण्याचे कधी ध्यानीमनी नव्हते. वडील पोर्ट ट्रस्टमध्ये कामाला होते. परिस्थिती अगदीच हलाखीची नसल्याने ‘स्ट्रगल’ नावाची बाब तोपर्यंत ध्यानीमनीही नव्हती.
‘फू बाई फू’ ठरला ‘टर्निंग पॉईंट’
वडिलांच्या निधनानंतर पोटासाठी चरितार्थ शोधावा लागला. पण, अभिनय स्वस्थ बसू देईना. कुटुंबियांच्या परवानगीने एक वर्ष अभिनयामध्ये अजमावून बघायचे ठरवले व रंगभूमी पहिल्यांदाच व्यावसायीकदृष्टय़ा गाठली. 1997 साली ‘यदा कदाचित’ नाटकाद्वारे रंगभूमीवर अधिकृत पाऊल ठेवले. थिएटरच्या माध्यमातून अभिनय सुरु असतानाच ‘झी मराठी’कडून ‘फू बाई फू’साठी विचारणा झाली. मात्र, थिएटरमध्ये वारणारा मी… कॅमेऱयासमोर, छोटय़ा जागेत कसा ‘ऍडजेस्ट’ होणार? ‘झी मराठी’ला नकार कळवला. ‘फू बाई फू’च्या दुसऱया पर्वासाठी विचारणा झाली तेव्हाही टाळाटाळ केली. परत तिसऱया पर्वासाठी विचारणा झाली. महाविनोदवीर कै. सतीश तारे माझे साथीदार असणार होते. त्यांच्या साथीने अभिनयाचे ‘तारे’ चमकतील या आशेने सहभागी झालो अन् ‘फू बाई फू’चा ‘विनर’ही बनलो.
‘हवा येऊ द्या’मुळे प्रसिद्धीचे शिखर
‘फू बाई फू’ने मला महाराष्ट्रभर पोहोचवले होते. याच दरम्यान अभिनेते रितेश देशमुख यांच्या ‘लय भारी’ चित्रपटाच्या ‘प्रमोशन’साठी ‘झी मराठी’वर खास ‘एपिसोड’ करायचा होता. अभिनेते, लेखक डॉ. नीलेश साबळे यांनी मला व कुशल बद्रिकेला विचारणा केली. पूर्वनियोजित ‘क्रीप्ट’ नसतानाही तीन तास रंगलेला कार्यक्रम रसिकांना भावला आणि तो ‘चला हवा येऊ द्या’ नावाने पुढे चालू राहिला. याच कार्यक्रमाने मला घराघरात पोहोचविले.
निरागसता हा अभिनय नव्हे, स्वभाव!
मी दहा-पंधरा वर्षे थिएटरमध्ये (नाटकांमध्ये) काढली आहेत. कारण, उत्कृष्ट अभिनेता होण्यासाठी हँडसम असणे गरजेचे आहे, हा त्यावेळी गैरसमज होता. पण, आता अभिनयाच्या संधी वाढल्यात. महत्वाचे म्हणजे थिएटरमध्ये मोठा काळ घालवल्याचाच फायदा आज चित्रपट, छोटय़ा पडद्यावरील कार्यक्रमांच्या अभिनयामध्ये होतोय. अभिनेत्यामध्ये निखळता, निर्मळता, प्रामाणिकपणा हे गुण मूळचेच असायला हवेत, तरच ते अभिनयामध्येही दिसतात. त्यामुळे निरागस अभिनय हा माझ्या स्वभावाचा भाग असावा. नव्या ऍक्टर्सनी आधी थिएटरला प्राधान्य द्यावे. रंगभूमीवरील अभिनयामुळे अभिनेता प्रगल्भ होतो. मेडिकल, इंजिनियरिंगच्या अभ्यासाप्रमाणे अभिनय हा देखील अभ्यासच आहे.
यश – अपयश पचवायला शिका
युवा तसेच अनुभवी कलाकारांसमोरही येत्या काळात मोठी आव्हाने असणार आहेत. अर्थात मेहनती, गुणवान आहेत, तेच स्पर्धेत टिकतील. कारण, अनेकांना ‘माहौल’ सहन करता येत नाही. यश-अपयश या दोन्ही बाबी पचवता, सहन करता यायला हव्यात. मुख्य म्हणजे हार न मानता आशावादी राहणे गरजेचे आहे.
लवकरच दोन चित्रपटांद्वारे भेटीस
येत्या काळात मी अभिनय करत असलेले ‘टाईमपास 3’ व ‘पांडू’ हे दोन चित्रपट रसिकांच्या भेटीस येणार आहेत. ‘टाईमपास 3’मध्ये मी पुन्हा एकदा ‘दगडू’ अर्थात प्रथमेश परब याच्या वडिलांच्या भूमिकेत आहे. ‘पांडू’मध्ये विनोदी अभिनेता आणि माझा मित्र कुशल बद्रिके तसेच सोनाली कुलकर्णी दिसणार आहे. दोन्ही चित्रपट पूर्णत्त्वाच्या दिशेने असून कोरोनाच्या कारणास्तव प्रदर्शित होऊ शकलेले नाहीत.
चरितार्थासाठी पानटपरी चालविली!
सुस्थितीत जगत असतानाच नोकरीतून निवृत्त झालेल्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले अन् कुटुंबावर समस्येचे जणू आभाळच कोसळले. पहिल्यांदाच पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. डोंबिवलीत रहायला आलो अन् जगण्याशी संघर्ष सुरु केला. मूळ कोकणचा असल्याने पान, सुपारी, तंबाखू, भाजकी मशेरी या गोष्टी परिचयाच्या होत्याच. भावाच्या साथीने पानटपरी सुरु केली. अभिनयात गुंतल्यानंतर ‘क्लोज’ झालेली पानटपरी काही वर्षांपूर्वीच ‘पूजा भंडार’ या नावाने सुरु केल्याचे भाऊ कदम सांगतात.
मुलांनी गाव ‘मिस’ करू नये म्हणून… मे महिन्याच्या सुटीत वडील आम्हाला घेऊन गावी यायचे. पुढे वडील गेले अन् गावाला कायमचे ‘मिस’ करून बसलो. आता कामाच्या विळख्यामुळे गावाला जायचे फक्त स्वप्नच बघू शकतो. सध्या कोरोनाच्या विळख्याने चित्रीकरण थांबले आणि गाव गाठण्याची संधी मिळाली. वडिलांच्या निधनानंतर मी गावाला मुकलो. पण, तशी परिस्थिती माझ्या मुलांच्या वाटय़ाला येऊ नये. म्हणूनच संपूर्ण कुटुंबाला घेऊन गावी आलो असल्याचेही भाऊ तरुण भारतशी बोलताना म्हणाले.









