ऑनलाईन टीम / पाटणा :
बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील नियामतपूर गावात 100 ते 150 लोकांनी दलित कुटुंबांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. दलित कुटुंबातील लोकांना मारहाण करून त्यांची घरेही उध्वस्त करण्यात आली आहेत. या घटनेत एक जण ठार झाला. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर प्रशासन सक्रिय झाले असून, गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 19 मे रोजी रात्री नियामतपूर गावात 100 ते 150 लोकांनी दलित कुटुंबांवर हल्ला करत त्यांना जबर मारहाण केली. त्यानंतर त्यांची घरे पेटवण्यात आली. या घटनेत नेव्हीलाल राय ठार झाले. दुसऱ्या दिवशी बैसी पोलीस ठाण्यात तीन एफआयआर दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात पूर्णिया पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दरम्यान, उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे.









