1959 मध्ये झाली होती घोषणा
वृत्तसंस्था/ धरमशाला
तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांना बुधवारी रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तिबेटी समुदायासाठी लढा आणि तिबेटी संस्कृतीला प्रेरणा दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. 1959 मध्ये त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली होती. मात्र त्यानंतर चीनमुळे ते तिबेटमधून भारतात आल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी जाऊ शकले नव्हते. आता 64 वर्षांनंतर हा पुरस्कार देण्यासाठी रॅमन मॅगसेसे पुरस्कार समितीची टीम दलाई लामा यांच्या हिमाचलमधील त्यांच्या घरी पोहोचली. दलाई लामा यांना देण्यात आलेला हा पहिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार होता.
1959 मध्ये दलाई लामांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला तेव्हा चीन तिबेटमधील बौद्ध धर्माच्या अनुयायांवर अत्याचार करत होता. चिनी हल्ल्यामुळे व्यथित होऊन दलाई लामा 1959 मध्ये तिबेट सोडून भारतात आले होते. यामुळे तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी जाऊ शकला नाही. त्यांचा मोठा भाऊ ग्यालो थोंडेंनी पुरस्कार कार्यक्रमाला जाऊन पुरस्कार स्वीकारला होता.
रॅमन मॅगसेसे पुरस्कार फिलीपाईन्सचे सातवे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या स्मरणार्थ दिला जातो. त्याची सुरुवात 1957 मध्ये झाली होती. समाजसुधारणेच्या क्षेत्रात चांगले काम करणाऱ्याला हा पुरस्कार दिला जातो. त्याला आशियाचा नोबेल पुरस्कार असेही म्हटले जाते.









