आमदार दिगंबर कामत यांची माहिती : आवश्यक बाबी मार्गी लावणार, तिसरे बेलिंग यंत्र कार्यान्वित
प्रतिनिधी /मडगाव
मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी मडगाव पालिकेचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, मुख्याधिकारी मानुएल बार्रेटो तसेच गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळाचे लेविन्सन मार्टिन व अन्य अधिकाऱयांसह शुक्रवारी सकाळी सोनसडा कचरा यार्डाला भेट देऊन सद्यस्थितीचा आढावा घेतला. प्रत्येक पंधरवडय़ात अशा प्रकारे आढावा घेऊन आवश्यक बाबी मार्गी लावल्या जाणार असल्याची माहिती आमदार कामत यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली.
सोनसडा यार्डमध्ये फक्त दोन बेलिंग यंत्रांद्वारे सुक्या कचऱयावर बेलिंग करण्यात येत होते. आता तिसऱया यंत्राला आवश्यक वीजजोडणी दुरुस्ती करून कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यांच्या जोडीला आणखी एक चौथे यंत्र सोनसडा येथे बेलिंगसाठी वापरात आणले जाईल, अशी माहिती कामत यांनी दिली. याखेरीज औद्योगिक वसाहतीमधील बेलिंग यंत्राद्वारे बेलिंग केले जात आहे. सुक्या कचऱयावर योग्य प्रकारे प्रक्रिया होत आहे, असे त्यांनी सांगितले.
पालिकेला ओला कचरा विल्हेवाट समस्या भेडसावत आहे. प्रकल्पाची शेड भरली असल्याने समस्या हाताबाहेर जात असल्याचे दिसून येत आहे. येथे सध्या कचरा जेसीबी यंत्राच्या मदतीने मधोमध आणून ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शेडच्या भिंतींवर ताण येऊ नये यासाठी हा कचरा मधोमध आणण्यात येत आहे. यापूर्वी कचऱयाच्या ताणाने भिंतीला तडे जाऊन भिंत कलंडण्याचे प्रकार घडल्याने ही खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे.
सोनसडय़ासाठी ज्या गोष्टी करणे आवश्यक आहे त्या तत्परतेने करण्याचे निर्देश आमदार कामत यांनी दिले. आवश्यक कामे पालिका मंडळाकडून मंजुरी मिळवून करून घ्यावीत तसेच वेळेवर संबंधितांची बिले फेडावीत, असे यावेळी कामत यांनी सांगितले. उच्च न्यायालयाचे निर्देश असल्याने पालिकेने सोनसडा येथील जुन्या कचऱयाच्या ढिगाऱयांवर बायोरेमेडिएशन प्रक्रिया करण्यासाठी वेगाने पावले उचलण्याचे ठरविले आहे. सदर काम घनकचरा व्यवस्थापन महामंडळाकडून नियुक्त कंत्राटदार करत असून पावसाळ्यापूर्वी फेब्रुवारीपर्यंत सर्व कचऱयाचे ढिगारे बायोरेमेडिएशन करून संपविले जातील, असे महामंडळाचे सदस्य सचिव मार्टिन यांनी सांगितले.









