अपडेटसाठी सक्ती नसल्याचे ‘युआयडीएआय’चे स्पष्टीकरण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकारने जारी केलेल्या नवीन निर्णयानुसार, प्रत्येक व्यक्तीला दर 10 वर्षांनी स्वतःचे आधार कार्ड अपडेट करावे लागणार आहे. परंतु, याबाबत सक्ती नाही असेही आधार प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. आधार कार्डशी संबंधित कागदपत्रे ऑनलाईन अपडेट करण्याची सुविधा ‘माय आधार’ पोर्टल किंवा ऍपवर उपलब्ध करण्यात आलेली आहे. याशिवाय नजिकच्या आधार नोंदणी केंद्रावर जाऊनही आधार कार्डचे नुतनीकरण केले जाऊ शकते.
सरकारने आधार कार्डशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आता आधार कार्डमध्ये ठेवलेली कागदपत्रे दर दहा वर्षांनंतर अपडेट करणे आवश्यक असेल. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या मते, आधार अपडेट केल्याने सेंट्रल आयडेंटिटी डेटा रिपॉझिटरीमधील संबंधित माहितीची अचूकता सुनिश्चित होईल. ‘आधार’धारक नोंदणीच्या तारखेपासून दर 10 वर्षांनी किमान एकदा ओळख आणि रहिवासी पुरावा असलेली कागदपत्रे अपडेट करू शकतात.
आधार क्रमांक जारी करणाऱया ‘युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया’ने गेल्या महिन्यात आधारप्राप्त नागरिकांना यासंबंधी महत्वाचा सल्ला दिला होता. स्वतःचा आधार क्रमांक जारी झाल्यापासून 10 वर्षांहून अधिक काळ झाला असल्यास संबंधित माहिती पुन्हा अपडेट करण्याची सूचना करण्यात आली होती. तसेच ओळखीचा आणि रहिवासाचा पुरावा अपडेट करण्याचे निर्देशही दिले होते. आधार कार्ड हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग बनले आहे. सरकारी कामानिमित्त असो किंवा बँकेचे काम किंवा नोकरीच्या ठिकाणी अशा प्रत्येक ठिकाणी आधार कार्डची आवश्यकता लागतेच. याच आधार कार्डच्या संदर्भात आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.









