लातूर पोलीसांची कामगिरी
लातूर : प्रतिनिधी
लातूर शहराजवळ असलेल्या अतिरिक्त एमआयडीसी भागातील बालाजी वेअर हाऊस या गोदामावर कांही जणांनी दरोडा टाकला होता. तेथील वॉचमनला मारहाण करून सुमारे 17 लाख रूपयांचे सोयाबीन चोरून नेले होते. घटनेनंतर कांही तासातच लातूरचे पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलातील विविध पथकानी या दरोड्याचा छडा लावुन चोरीला गेलेले 100 टक्के सोयाबीनसह चोरीस वापरण्यात आलेली दोन ट्रक व सहा जणांना ताब्यात घेतले आहे. लातूर पोलीसांच्या या दमदार कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
येथील अतिरिक्त एमआयडीसी भागातील बालाजी वेअरहाऊस येथे एक फेब्रुवारीच्या पहाटे कांही जणांनी तेथील वॉचमनला मारहाण करून त्याला बांधून शटर उचकावून सुमारे 17 लाख रूपयांचे 546 पोती सोयाबीन लंपास केले होते. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अनुराग जैन, शहर पोलीस उपाधिक्षक जितेंद्र जगदाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले आदिंच्या नेतृत्वाखाली पोलीसांनी या घटनेच्या चौकशीसाठी पथके नेमली होती. एका नागरीकाच्या थोड्याशा माहितीनुसार पोलीस चोरीस गेलेल्या मालापर्यंत पोहचले. पोलीसांनी नुर इसाक सय्यद वय 53, रा. सुरतशहावली दर्गा रोड, लातूर यास ताब्यात घेतले. त्याची विचारपुस करताच नुर याने आपल्याकडे कोयणे व शिवनगे या नावाचे दोन व्यक्ती आले होते. त्यांनी गोदामातील सोयाबीन ट्रकमध्ये भरावयाचे असे सांगुन त्याच्या कारमधून गोदामाकडे नेले. एम.एच.11 ए.एल.1885 व एम.एच.12 एफ.सी.7028 या दोन ट्रकमध्ये या गोदामातील 546 पोती बिहारी हमालाच्या मदतीने भरण्यात आले. त्यापैकी 1885 क्रमांकाचा ट्रक सोयाबीन घेवून कृषीधन वेअर हाऊस, बाफाना शोरूम जवळ, नांदेड रोड, लातूर येथे नेण्यात आला. तर 7028 क्रमांकाचा ट्रक मार्केट यार्ड परिसरात असलेल्या खडप यांच्या आडत दुकानात माल उतरविण्यात आल्याची माहिती पोलीसांना मिळाली. पोलीसांनी त्याठिकाणी जावून त्या क्रमांकाचा ट्रक व माल जप्त केला. पोलीसांनी नूर इसाक सय्यद एका ट्रक चालक आनंत कांबळे यांच्यासह सहा जणांना ताब्यात घेतले.
या गुन्ह्यामध्ये सुमारे 17 लाख रूपयांचा माल चोरीस गेला होता. चोरीस गेलेला संपूर्ण माल वसुल करण्यात पोलीसांना यश आले असुन पोलीसांनी देखील अत्यंत तत्परता दाखवुन 24 तासाच्या आत चोरीचा माल व ट्रक ताब्यात घेतले.