प्रतिनिधी / सातारा :
तरडगाव ता. फलटण गावच्या हद्दीत परहर फाटा ते मॅग्नेशिया कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रेल्वे पुलावर पाच चोरट्यांनी फिर्यादीस कोयत्याचा धाक दाखवून गाडीची काच फोडली. तसेच कारमधील 5 लाख 9 हजारांची रोकड, फिर्यादीचा 25 हजार रूपये किंमतीचा मोबाईल, कारची चावी असा ऐवज दि. 9 रोजी चोरून नेला होता. या प्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी तेरा दिवसात या गुन्ह्यातील आठ आरोपींना जेरबंद केले. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली.
याबाबत पोलीस अधीक्षक बन्सल म्हणाले, या घटनेचे गांर्भीय ओळखून लोणंद, शिरवळ, व फलटण शहर पोलीस स्टेशनच्या वेगवेगळ्या चार टिम तयार करून त्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आधार घेत लोणंद ते जेजुरी पर्यंत मागोवा घेतला. तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने दि. 12 रोजी एका आरोपींस ताब्यात घेवून त्याच्याकडे विचारपुस करून गुन्ह्याची उकल केली. याच दिवशी दुसरा आरोपी ता. भोर जि. पुणे येथून ताब्यात घेतला. त्याने पुण्यातील त्यांच्या साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. पुण्यातील आरोपीची ओळख करून व त्यांच्याशी संपर्क करून देणाऱ्या बसमत जि. हिंगोली येथून स्थानिक पोलीसांचे मदतीने ताब्यात घेतले. पुण्यातील आरोपींना पुणे शहरातून कात्रज, बिबवेवाडी या परिसरातून ताब्यात घेतले आहे. यामुळे गुन्हा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश आले.
दत्तात्रय किसन शिरवले (वय 19 रा. शिरवली ता. भोर), विशाल लक्ष्मण शिरवले (वय 20 रा. शिरवली ता. भोर), कृष्णा आनंदा चव्हाण (वय 23 रा. आसेगाव जि. हिंगोली), रोहन सचिन भालके (वय 18 रा. कात्रज, पुणे), शिवा उन्नाप्पा राठोड (वय 21 रा. इंदिरानगर बिबवेवाडी), पवन विकास ओव्हाळ (वय 20 रा. इंदिरानगर बिबवेवाडी), राजु अशोक जाधव (वय 20 रा. माणगाव हिंजवडी), प्रमोद ऊर्फ बारक्या श्रीकांत पारसे (वय 21 रा. भारती विद्यापीठ पुणे) अशी या आरोपींची नावे असून, त्यांना 20 रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड घेवून त्यानंतर न्यायालयीन कोठडी घेण्यात आली आहे. चोरीच्या रकमेपैकी 4 लाख 1 हजार 500 रूपये, 25 हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आला आहे.









