कोरोना विषाणूसंबंधी एक महत्त्वाचे संशोधन समोर आले आहे. काही ओरल अँटीसेप्टिक्स आणि माउथवॉशद्वारे माणसांमधील कोरोना विषाणूला निष्क्रीय करता येऊ शकते, असे वैज्ञानिकांना आढळून आले आहे. मेडिकल वायरोलॉजीच्या जर्नलमध्ये प्रकाशित निष्कर्षामध्ये ही बाब नमूद आहे. संशोधनानुसार काही ओरल अँटीसेप्टिक्स आणि माउथवॉश संक्रमणानंतर तोंडातील विषाणूचे प्रमाण कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात तसेच विषाणूचा प्रसार कमी करण्यास मदत करू शकतात.
लस विकसित होण्याची प्रतीक्षा सुरू असताना कोरोनाचा फैलाव कमी करण्याच्या पद्धतींची गरज भासते. परीक्षण केलेली उत्पादने सहजपणे उपलब्ध आहेत आणि लोकांच्या दिनचर्येचे भाग आहेत असे अमेरिकेच्या पेन स्टेट युनिव्हर्सिटीतील संशोधक क्रेग मेयर्स यांनी म्हटले आहे. अध्ययनादरम्यान वैज्ञानिकांच्या पथकाने माणसांमध्ये कोरोना विषाणू निष्क्रीय करण्यासाठी एक प्रयोग केला आहे. या प्रयोगात अनेक ओरल आणि नसॉफिरिन्जियल माउथवॉशचे परीक्षण करण्यात आले.
या संशोधनात मूल्यांकन करण्यात आलेल्या उत्पादनांमध्ये बेबी शॅम्पू, पेरोक्साइड, गळा आणि तोंडाची सफाई करणाऱया माउथवॉशचे एक टक्के सोल्युशन सामील करण्यात आले. अनेक नेजल आणि ओरल रिजेंसमध्ये कोरोना विषाणू निष्प्रभ करण्याची मोठी क्षमता होती असे संशोधकांना दिसून आले आहे. या उत्पादनांमध्ये लोकांद्वारे फैलावलेल्या विषाणूचे प्रमाण कमी करण्याची क्षमता असू शकते.









