प्रतिनिधी/कोल्हापूर
स्थानिक स्वराज्य संस्था या राजकीय शिक्षण देऊन कार्यकर्ते व नेते घडवणाऱ्या शाळा आहेत. या माध्यमातून स्थानिक कार्यकर्ते, नेते व संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी राजर्षी शाहू महाराजांचा समतेचा संदेश उराशी बाळगून पुढील काळातही सर्वसामान्य लोकांसाठी चांगले काम करावे. दरडोई उत्पन्नात पहिल्या क्रमांकावर असणारा कोल्हापूर जिल्हा गेल्या काही वर्षात सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता पुन्हा पहिला क्रमांक मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावेत, असे आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
जिल्हा परिषदेच्यावतीने येथील सैनिक कल्याण सभागृहात आयोजित राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार, अचार्य अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार व महा आवास योजना पुरस्कार वितरण प्रसंगी ग्रामविकास मंत्री मुश्रीफ बोलत होते. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, राजीव आवळे, जयंत आसगावकर, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, उपाध्यक्ष जयवंत शिंपी, सीईओ संजयसिंह चव्हाण यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे
राज्यात महापूर व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे, अशा कठीण परिस्थितीत राज्य शासन शेतकऱयांच्या पाठीशी ठामपणे उभे असून विकास कामांना कात्री लावून शेतकऱयांना आधार दिला जाईल, अशी ग्वाही मंत्री मुश्रीफ यांनी दिली.
सहा लाख लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न पूर्ण
राज्यातील गोरगरीबांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यात प्रशासनाची दिरंगाई कारणीभूत ठरत होती. लाभार्थ्यांच्या याद्या मंजूर होते. परंतु घरकुलाचा लाभ दिला जात नव्हता. ही बाब लक्षात आल्यानंतर राज्यस्तरावर महा आवास अभियान ही मोहीम राबवून 90 दिवसात आठ लाख लाभार्थ्यांना घर देण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी 6 लाख घरे पूर्ण झाली असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्हा परिषद देशात आघाडीवर हवी
पुरस्कार मिळालेल्या प्रत्येकाची एक नवीन सुरुवात असून यापुढील काळात देखील परस्परांच्या सहकार्याने अधिक उत्कृष्ट काम करावे. कोल्हापूर जिल्हा परिषद ही विकासात्मक कामात राज्यातच नव्हे तर देशात आघाडीवर असली पाहिजे. असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना केले. जि.प., पं.स., ग्रा.पं. सदस्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा कायापालट करण्याची मोठी संधी आहे. जिल्हा परिषदेने निर्मल ग्राम व ओडीएफ मध्ये चांगले काम केले असून यापुढील काळात जिल्हा परिषद ओडीएफ प्लस झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना पालकमंत्री पाटील यांनी केली.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मनांगत व्यक्त केले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी सर्व मान्यवरांचे व पुरस्कार प्राप्त व्यक्ती यांचे स्वागत केले. तर मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष जयवंत शिंपी यांनी आभार मानले.
मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण
जिल्हा परिषदेच्या वतीने सन 2020-21 व 2021-22 या दोन वर्षात जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, कर्मचारी यांना दिला जाणारा राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार व महा आवास योजना पुरस्कारांचे वितरण मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
पुरस्कार प्राप्त जि.प. सदस्य
रोहिणी अर्जुन आबिटकर, विशाल सुरेश महापुरे, कल्पना चौगले, विजय भोजे, शिवानी भोसले, शिल्पा चेतन पाटील, विनय पाटील हे जि.प. सदस्य तर कागल पंचायत समिती सभापती पुनम मगदूम-महाडिक यांना सन्मानित करण्यात आले.
उत्कृष्ठ पत्रकार, कर्मचाऱयांचा गौरव
जिल्हा व तालुकास्तरावरील पत्रकारांना आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने गौरविण्यात आले. यामध्ये सन 2020-21 मधील बारा पत्रकारांना तर 2021-22 मध्ये जिल्हास्तर एक व तालुकास्तरावरील बारा पत्रकारांना वितरित करण्यात आले. यामध्ये दैनिक तरुण भारतचे टोप वार्ताहर नंदकुमार साळोखे, आजरा प्रतिनिधी सुनिल पाटील, भुदरगडचे (वाघापूर) तालुका प्रतिनिधी अनिल कामिरकर यांचा समावेश आहे. तसेच सन 2020-21 मधील 17 कर्मचारी तर सन 2021-22 मधील 13 कर्मचाऱयांना राजर्षी शाहू पुरस्काराने गौरविण्यात आले.









