अक्कलकोट / प्रतिनिधी
एका खाजगी सावकाराने दमदाटी करून जबरदस्तीने जमीन खरेदी करून घेतली. याचा धक्का बसल्याने ४८ वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बोरी उमरगे (ता. अक्कलकोट) येथे मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास घडली.श्रीशैल मल्लेशी बिराजदार असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.ऑ
श्रीशैल बिराजदार यांनी गावातीलच मल्लिनाथ नारायण पाटील यांच्याकडून २०१९ मध्ये कौटुंबिक अडचणी भागवण्यासाठी उसने पैसे घेतले होते. त्यावेळी मल्लिनाथ पाटील याने श्रीशैल बिराजदार यांच्या अज्ञानाचा फायदा घेत तीन एकर जमीन स्वतःच्या नावावर खरेदी करुन घेतली. त्यानंतर बिराजदार यांच्या लक्षात आल्यानंतर जमीन पुन्हा स्वतःच्या नावावर करुन देण्यासाठी आग्रह केला. परंतु पाटील यांनी दमदाटी करत जमीन परत देण्यास नकार दिला. बिराजदार यांनी वारंवार आग्रह करून जमिन मिळवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आले नाही.
१६ डिसेंबर रोजी श्रीशैल बिराजदार यांना तुझी जमीन तुझ्या नावावर करतो असा बहाणा करत उर्वरित जमीनही स्वतःच्या नावावर खरेदी करून घेतली. गावच्या लोकांनी मल्लिनाथ पाटील यांना त्या शेतकऱ्यांची जमीन परत करण्यास सांगितले. मात्र त्यांना दाद न देता मध्यस्थी करणाऱ्यांना आणि बिराजदार यांच्या कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या भीतीमुळे श्रीशैल बिराजदार यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून अत्यवस्थ असलेल्या बिराजदार यांच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पीडित शेतकऱ्याची पत्नी, बसवराज व स्वामीनाथ ही दोन मुले मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. नावावर असलेली जमीन सावकारांनी लुबाडल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
यापूर्वीही मल्लिनाथ नारायण पाटील याने एका पीडित व अपंग महिलेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तिचेही पैसे लुबाडले आहेत, तसेच त्या महिलेची जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली आहे. याबाबत अक्कलकोटच्या दक्षिण पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी मल्लिनाथ पाटील याला जेलची हवा ही खावी लागली आहे. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीमध्ये नोंद झाली आहे. अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे अधिकारी पुढील चौकशी करत आहेत.









