वृत्तसंस्था/ बेंगळूर
आठव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत शनिवारी येथे झालेल्या 81 व्या सामन्यात दबंग दिल्लीने गुजरात जायंट्सचा 41-22 अशा गुणांनी पराभव करत स्पर्धेच्या गुणतक्त्यात आघाडीचे स्थान मिळविले.
शनिवारच्या सामन्यातील विजयामुळे दबंग दिल्लीने स्पर्धेच्या गुणतक्त्यात आघाडीचे स्थान पटकाविले आहे. गुजरातविरूद्धच्या सामन्यात दबंग दिल्ली संघातील बचावफळीत खेळणाऱया मनजीत चिल्लर आणि कृष्णन यांनी प्रत्येकी 5 गुण तसेच विजयने 8 व नीरज नरवालने 4 गुण मिळविले. या सामन्यात प्रमुख रायडर नवीनकुमार दिल्ली संघाकडून खेळू शकला नाही. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत दिल्लीने गुजरातवर 22-11 अशी भक्कम आघाडी घेतली होती. सामन्याच्या उत्तरार्धात दिल्ली संघाने गुजरातचे दुसऱयांदा सर्वगडी बाद करून 16 गुणांची आघाडी घेतली. या पराभवामुळे गुजरात संघाने स्पर्धेच्या गुणतक्त्यात 11 वे स्थान पटकाविले आहे.









