प्रतिनिधी / शिरोळ
शिरोळ तालुक्यामधील दत्तवाड गाव आणि परिसरामध्ये बिबट्यासदृश्य प्राण्याचे दर्शन झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे,
दत्तवाड येथील हिम्मतराव खराडे यांच्या फार्म हाऊस समोर वन्य प्राण्याचे ठसे आढळल्याचे निदर्शनास आले आहे. एकूणच या परिसरातील नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणामुळे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करावी व वन्य प्राण्याचा शोध घ्यावा असे आदेश वनविभागाचे हातकणंगले विभागाचे वनपाल घनशाम भोसले यांना दिले आहेत.
वनविभागाकडून रविवारी १५ कर्मचाऱ्यांचे पथक दतवाड परिसरात दाखल होत असून वन विभागामार्फत वन्यप्राण्याच्या शोधासाठी दुपारी चार वाजता चार ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसवले जाणार आहेत, वन विभागाचे हे पथक दत्तवाड परिसरात दोन दिवस थांबून शोध मोहीम राबवणार आहे, पथकामध्ये वनपाल, वनरक्षक, डॉक्टर, वनमजुर यांच्यासह वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार असून स्थानिक सर्पमित्रांची या कामी मदत घेणार असल्याची माहिती वनपाल भोसले यांनी दिली आहे.









