1 वर्षाच्या आतील मूल दत्तक घेतल्यांना लाभ
प्रतिनिधी / बेळगाव
दत्तक मुलांच्या संगोपनाबाबत राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले असून यापुढे मूल दत्तक घेतलेल्या पालकांनासुद्धा प्रसूती रजेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे मूल दत्तक घेतलेल्या पालकांना मोठा दिलासा मिळाला असून सरकारच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.
नव्या नियमानुसार ज्या स्त्राrने मूल दत्तक घेतले आहे, तिला 180 दिवसांची प्रसूतीकालीन रजा मिळणार आहे. वडिलांना 15 दिवसांची पगारी रजा मिळणार आहे. यापूर्वी दत्तक मूल घेतलेल्या पालकांना आपल्या हक्काच्या रजा घालून बाळाचे संगोपन करावे लागत होते. मात्र, दत्तक बाळाबरोबर पालकांची नाळ जुळावी व त्यांच्यात मायेचा भावबंध निर्माण व्हावा, यासाठी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तथापि, ज्या जोडप्याने 1 वर्षाच्या आतील मूल दत्तक घेतले आहे, त्यांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे.
राज्य सरकारचा हा निर्णय दत्तक मुलांच्या पालकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. सरकारने याबाबत फेब्रुवारी 2020 मध्ये ऑर्डर काढली होती. मात्र, कोरोनामुळे अनेकांना याबाबत माहितीच मिळू शकली नाही. आता मात्र दत्तक मुलांच्या पालकांना याचा लाभ होणार आहे.
काही जोडप्यांनी वृद्धापकाळात मूल दत्तक घेतलेले असते. त्यांना आपल्या रजा खर्च कराव्या लागतात. अशा जोडप्यांचासुद्धा सरकारने विचार करावा व त्याबाबत जनजागृती करावी, अशी अपेक्षा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या खजिनदार टी. आर. वेदवती यांनी केली आहे. समाजात याबाबत अद्यापही वेगळीच मानसिकता आहे. आपल्या रक्ताचे मूल हा दुराग्रह दत्तक पालकांसाठी त्रासदायक ठरतो. आता सरकारने अशा पालकांना मोठा दिलासा दिला आहे, असे बालहक्क कार्यकर्ते वासुदेव शर्मा यांनी स्पष्ट केले.









