ऑनलाईन टीम / पुणे :
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे गणेश गीत गायन स्पर्धा २०२१ या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्री गणेश, त्याची रुपे आणि लिलांचे वर्णन करणारी आरती, भजन, अभंग, बालगीत, उत्सवगीत, स्तोत्र वयवर्षे ५ ते पुढील वयोगटातील स्पर्धकांनी ऑडिओ किंवा व्हिडीओ स्वरुपात पाठवायची आहेत. श्री गणेशाचे वर्णन करणारी नवी गीते समोर यावी आणि गणेशभक्तांना घरबसल्या गीतांद्वारे गणरायाच्या चरणी सेवा अर्पण करावी हा स्पर्धेमागील उद्देश असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.
गणेश गीत गायन स्पर्धा ही तीन वयोगटंमध्ये होणार आहे. पहिला वयोगट ५ ते १५ वर्षे, दुसरा वयोगट १६ ते ४५ वर्षे आणि तिसरा वयोगट ४५ वर्षांपुढील स्पर्धकांसाठी असणार आहे. स्पर्धेत तिन्ही वयोगटातील विजेतपद मिळविणारे पहिले तीन स्पर्धक, सर्वोत्तम गीतकार आणि सर्वोत्तम संगीत रचना अशी एकूण १ लाख ५१ हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच सहभागी प्रत्येक स्पर्धकास प्रशस्तीपत्रक देखील देण्यात येईल. मुख्य विजेत्यांना मंदिरात स्वराभिषेकांतर्गत गणरायासमोर प्रत्यक्ष गायनसेवा देण्याची संधी मिळणार आहे.
स्पर्धेकरीता गीत सादर करताना कोणत्याही एक किंवा अधिक वाद्यांची संगत स्पर्धक घेऊ शकतात. तबला, तानपुरा, हार्मोनियम किंवा अन्य वाद्यांचा वापर देखील स्पर्धकांना करता येईल. सादरीकरण लाइव्ह म्युझिकवर रेकॉर्ड करणे आवश्यक आहे. कोणत्याही कॅरिओके किंवा मायनस वन ट्रॅकवर रेकॉर्ड केलेले सादरीकरण स्पर्धेस पात्र ठरणार नाही. सादरीकरणाचा आॅडिओ किंवा व्हिडिओ स्पर्धकाने पाठवायचा आहे. तसेच सादर केलेले गात कोणत्याही प्रकारे कॉपीराइडेट नसावे, तसेच ३ ते १२ मिनिटे असावे, याची स्पर्धकांनी काळजी घ्यावी.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज https://seva.dagdushethganpati.com/geetgayan या लिंकवर उपलब्ध आहे. दिनांक १० ऑगस्टपर्यंत स्पर्धकांनी आपला सहभाग फॉर्म भरुन निश्चित करायचा आहे. तसेच गीताचा ऑडिओ किंवा व्हिडिओ पाठवावा. गीत पाठविण्याची अंतिम तारीख दिनांक २० ऑगस्ट असणार आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.