ऑनलाइन टीम / पुणे :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या तृतीयपंथीयांना दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे धान्य देण्यात आले. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भविलेल्या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टतर्फे विविध घटकांना मदतीचा हात देण्यात येत आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अप्पर इंदिरानगर बिबवेवाडी परिसरात राहणा-या 100 हून अधिक तृतीयपंथीयांना एक महिना पुरेल इतकी धान्याची मदत देण्यात आली. यावेळी ट्रस्टचे सरचिटणीस माणिक चव्हाण, निर्भया संस्थेच्या तृतीयपंथी चांदनी गोरे यांसह काही कार्यकर्ते उपस्थित होते.
बिबवेवाडी परिसरातील तृतीयपंथीयांना घरोघरी जाऊन ही गहू, तांदूळ, तेल, डाळी यांसह कडधान्य मदत म्हणून देण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.