ऑनलाईन टीम / पुणे :
नववर्षाच्या प्रारंभी गणरायाचे दर्शन घेऊन निरोगी आरोग्याचे मागणे मागण्याकरीता भाविकांनी सकाळपासून दगडूशेठ गणपती मंदिरात गर्दी केली. शासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन भाविकांना मंदिरात प्रवेश देण्याकरीता ट्रस्टतर्फे सोय करण्यात आली होती. मंदिर परिसरात सॅनिटायझेशन, मास्क व इतर आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे नववर्षाच्या प्रारंभी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या. सुरक्षा तपासणी, सॅनिटायझेशनसह हार-फुले-नारळ न स्विकारण्याकरीता सूचना देण्यात येत होत्या. ट्रस्टचे सुरक्षारक्षक, कर्मचारी व कार्यकर्त्यांनी भाविकांना दर्शन घेणे सुलभ व्हावे, याकरीता सकाळपासून तयारी केली होती.
ट्रस्टचे सुनील रासने म्हणाले, सकाळी 6 वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. नवे वर्ष सर्वांना सुखाचे, आनंदाचे आणि आरोग्यसंपन्न होवो, अशी प्रार्थना आम्ही गणरायाचरणी करीत आहोत. प्रत्यक्ष मंदिरात येऊन दर्शन घेण्यासोबतच अनेकांना ट्रस्टच्या यू ट्यूब, फेसबुक, वेबसाईट व इतर माध्यमांद्वारे देखील मोठया प्रमाणात दर्शन घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.









