स्टार प्रवाहवरील ’दख्खनचा राजा ज्योतिबा‘ या मालिकेने नुकताच 100 भागांचा टप्पा गाठला. या खास दिवसाचं सेलिब्रेशन अनोख्या पद्धतीने करण्यात आलं. कोल्हापूरमधील चेतना अपंगमती विकास संस्थेतील विकलांग मुलांसोबत मालिकेच्या टीमने 100 भागांच्या पूर्ततेचा आनंद साजरा केला. चेतना अपंगमती विकास संस्था गेली अनेक वर्ष बौद्धिक अक्षम मुलांचं संगोपन करुन त्यांना स्वतःच्या पायावर उभे रहाण्याचे धडे देत आहे. या मुलांच्या चेहऱयावर हसू फुलवण्याच्या हेतूने दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेच्या टीमने या मुलांसोबत सेलिब्रेशन करण्याचं ठरवलं. या खास प्रसंगी निर्माते महेश कोठारे आणि मालिकेतील प्रमुख कलाकार उपस्थित होते.
मालिकेत दिसणाऱया कलाकारांना प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद या मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या चेहर्यावर दिसत होता. ज्योतिबा आणि मालिकेतील सर्व कलाकारांची भेट घेत त्यांनी मालिकेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ’दख्खनचा राजा ज्योतिबा‘ मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. मालिकेचा यापुढील प्रवासही तितकाच रोमहर्षक असणार आहे. तेव्हा महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताची कथा 22 फेब्रूवारीपासून नव्या वेळेत म्हणजेच सायंकाळी 6 वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे.