प्रतिनिधी/ वास्को
zzदक्षिण गोवा आणि उत्तर गोवा जिल्हा पंचायतीवर भाजपाच सत्ता स्थापन करेल असा विश्वास पंचायतराज्यमंत्री माविन गुदिन्हो व्यक्त केला आहे. जिल्हा पंचायतीना अधिक अधिकार देण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. 15 व्या वित्त आयोगाच्या निधीपैकी 15 टक्के रक्कम ही जिल्हा पंचायतीना देण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.
माजी संरक्षणमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांची जयंती दाबोळी मतदारसंघात नवेवाडेतील पंचायतमंत्र्यांच्या कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य ऍड. अनिता थोरात तसेच भाजापाचे कार्यकर्ते दिगंबर आमोणकर, संतोष केरकर, संदीप सूद, तुळशिदास पटेकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. स्व. मनोहर पर्रीकर हे भाजपाचे थोर नेते होते आणि ताळागाळातील कार्यकर्त्यांसाठी ते एक प्रेरणास्थान होते अशा शब्दांनी मंत्री गुदिन्हो यांनी मनोहर पर्रीकर यांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी त्यांनी जिल्हा पंचायत निवडणुक भाजपाच जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही जिल्हा पंचायतीवर भाजपाचाच झेंडा फडकणार आहे. उत्तरेत भाजापाला पूर्ण बहुमत प्राप्त होणार आहे. दक्षिण गोव्यात भाजपाला बहुमत चुकल्यास अपक्षांचा पाठींबा निश्चितच मिळेल. त्यामुळे दोन्ही जिल्हा पंचायतींवर भाजपाचीच सत्ता स्थापन होईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा पंचायतींना त्यांचे अधिकार मिळायलाच हवेत. त्यांच्याकडे जे अधिकार आहेत त्याच्यापेक्षा अधिक अधिकार त्यांना बहाल करण्यासाठी सरकार योग्य तो निर्णय घेणार आहे. जिल्हा पंचायतींना अधिक निधी प्राप्त व्हावा यासाठीही सरकार प्रयत्नशील राहिल. 15 वित्त आयोगाचा उपलब्ध होणाऱया निधीपैकी जिल्हा पंचायतींना 15 टक्के निधी उपलब्ध होणार असल्याचे मंत्री गुदिन्हो म्हणाले.









