प्रतिनिधी/ बेंगळूर
दक्षिण भारतातील पहिल्या वंदे भारत रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी हिरवे निशाण दाखविले. चेन्नई-बेंगळूर-म्हैसूर मार्गावर धावणाऱया वंदे भारत सेमी हायस्पीड रेल्वेचे बेंगळूरमधील क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा रेल्वे स्थानकावर लोकार्पण करण्यात आले. ही रेल्वे म्हैसूरहून निघून चेन्नईला पोहोचणार आहे. ही देशातील पाचवी वंदे भारत रेल्वे आहे.
चेन्नई-म्हैसूर दरम्यान धावणारी ही रेल्वे वाणिज्य क्यवहारांनाही प्रोत्साहन देणारी ठरणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. स्वदेशी निर्मित वंदे भारत रेल्वेत अपघात नियंत्रण तंत्रज्ञान ‘कवच’ यासारख्या अत्याधुनिक फिचर्सचा समावेश आहे. 52 सेकंदात 100 कि. मी. इतका वेग घेण्याची क्षमता या रेल्वेमध्ये आहे. याचा कमाल वेग प्रतीतास 189 कि. मी. इतका आहे.
नैर्त्रुत्य रेल्वेकडून तिकीट दरपत्रक जारी
पंतप्रधान मोदी यांनी लोकार्पण केलेल्या चेन्नई-बेंगळूर-म्हैसूर मार्गावरील वंदे भारत रेल्वेसाठी नैर्त्रुत्य रेल्वे विभागाने दरपत्रक जारी केले आहे. ही सेमी हायस्पीड रेल्वे बुधवार वगळता सर्व दिवस धावणार आहे. कटपाडी आणि बेंगळूर या रेल्वे स्थानकावर रेल्वेला थांबा देण्यात आला आहे. उपाहारासह म्हैसूरहून आणि बेंगळूरपर्यंत सीसी कोचसाठी 720 रु. आणि ईसी कोचसाठी 1,215 अशा दोन प्रकारचे तिकीट दर निश्चित करण्यात आले आहेत. तर बेंगळूरहून म्हैसूरला जाण्यासाठी अनुक्रमे 515 रु. आणि 985 रु. असे दर निश्चित करण्यात आले आहे. चेन्नईहून म्हैसूरला जाणाऱया प्रवाशांना सीसी कोचसाठी 1,200 रु. आणि ईसी कोचसाठी 2,295 रु. आणि म्हैसूरहून चेन्नईला जाण्यासाठी अनुक्रमे 1,365 रु. आणि 2,485 रु. असे तिकटीदर आहेत. म्हैसूर ते चेन्नई हा प्रवास 6 तास 35 मिनिटांचा असेल. तर बेंगळूर-म्हैसूर दरम्यानच्या प्रवासासाठी साधारण 2 तासांचा असेल.
गौरव काशी दर्शन यात्रेलाही प्रारंभ
गौरव काशी दर्शन रेल्वेला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखविला. रेल्वे खात्याच्या भारत गौरव योजनेंतर्गत कर्नाटक धर्मादाय खात्याने काशीयात्रा योजना हाती घेतली आहे. शुक्रवारी या योजनेंतर्गत काशीयात्रेच्या रेल्वेला मार्गस्थ करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत काशीयात्रा करणाऱयांना 5 हजार रुपयांची सलवत देण्यात आली आहे. आठ दिवसांच्या प्रवासात रेल्वे वाराणसी, अयोध्या आणि प्रयागराजसह इतर धार्मिक स्थळांना जाणार आहे. भारत गौरव योजनेंतर्गत ही रेल्वे सुरू करणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. त्याबद्दल पंतप्रधानांनी कर्नाटकाचे ट्वीट करून अभिनंदन केले आहे.









