अडीच लाख मतदार संघ्या असलेल्या भागासाठी रुग्णालय पुरेसे आहे का? नागरिकांचा सवाल
प्रतिनिधी/ बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेमधील वडगाव जिल्हा आरोग्य खात्याच्या कार्यालय आवारात 10 खाटांचे प्रसूतीगृह उभारण्यात येत आहे. महापालिकेची प्राथमिक आरोग्य केंदे बंद करण्यात आली असून अडीच लाख मतदार असलेल्या क्षेत्रात केवळ 10 खाटांचे प्रसूतिगृह पुरेसे आहे का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात रस्त्यांचा विकास, बसथांब्यांची सुधारणा आणि पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध करण्यात आले आहे. वंटमुरी येथे 30 खाटांच्या प्रसूतीगृहाची इमारत उभारण्यात आली आहे. वडगाव येथे 10 खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेत निधीची तरतूद करण्यात आली असून इमारत बांधण्याचे काम सुरू आहे.
सदर इमारत कार्यालय आवारात उभारण्यात येत असून दक्षिण भागासाठी हे रुग्णालय पुरेसे आहे का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. दक्षिण भागात विविध ठिकाणी महापालिकेची प्राथमिक आरोग्य केंदे सुरू करण्यात आली होती. यामध्ये दोन ठिकाणी प्रसूतीगृहाचा समावेश होता. पण वैद्यकीय अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली नसल्याने महापालिकेची प्राथमिक आरोग्य केंदे बंद करण्यात आली आहेत. होसूर, शहापूर आणि अनगोळ येथे प्रसूतीगृह होते. या ठिकाणी महिलांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. मात्र, महापालिकेने सदर आरोग्य केंदे बंद केली असून, जिल्हा आरोग्य खात्याच्यावतीने प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी प्रसूतीसाठी कोणतीच सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयावरच नागरिकांना अवलंबून रहावे लागते.
गरीब नागरिकांना खासगी रुग्णालयात उपचार घेणे महागडे ठरत आहे. सध्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत वडगाव येथे उभारण्यात येणारे प्रसूतीगृह लाभदायक ठरणार आहे. पण अडीच लाख मतदार संख्या असलेल्या भागासाठी केवळ दहा खाटांचे रुग्णालय उभारण्यात येत असल्याने अपुरे पडण्याची शक्मयता आहे. अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्याच्यादृष्टीने उभारण्यात येत असलेली इमारत अपुरी पडू शकते. त्यामुळे या इमारतीचा विस्तार करण्याच्यादृष्टीने विचार करण्याची गरज आहे.
इमारतीच्या विस्तारच्या प्रस्तावाबाबत
आरोग्य खाते विचार करणार का?
या परिसरात आरोग्य खात्याची जागा मोठय़ा प्रमाणात आहे. पण जादा क्षमतेचे रुग्णालय उभारण्याच्यादृष्टीने प्रशासनाने कोणताच प्रस्ताव केला नाही. त्यामुळे जिल्हा पालकमंत्र्यांच्या बैठकीत अधिकाऱयांच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली होती. इमारतीचा विस्तार करण्याची सूचना करण्यात आली आहे. या प्रस्तावाबाबत आरोग्य खाते विचार करणार का? अशी विचारणा नागरिक करीत आहेत.









