फ्ल्यूची लस घेतल्याने 13 जणांचा मृत्यू : लसीकरण रद्द करण्याची मागणी
कोरोनावर बऱयापैकी नियंत्रण मिळविणाऱया दक्षिण कोरियामध्ये नवी समस्या उभी ठाकली आहे. दक्षिण कोरियात फ्ल्यूची लस घेतल्याने लोकांचा मृत्यू झाला आहे. फ्ल्यूची लस घेतल्यावर 13 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. फ्ल्यू लसीकरण मोहीम रोखली जावी असे मत दक्षिण कोरिया मेडिकल असोसिएशनने मांडले आहे. परंतु ही लस आणि या मृत्यूंमध्ये कुठलाच थेट संबंध आढळला नसल्याचे आरोग्य अधिकाऱयांचे म्हणणे आहे.
सरकार जोपर्यंत लस सुरक्षित मानत नाही तोवर लसीकरण रोखण्यात यावे, असे कोरियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष चोई डे जिप यांनी म्हटले आहे. दक्षिण कोरियात जवळपास 1.3 कोटी लोकांना फ्ल्यूची लस देण्यात आली आहे. हिवाळय़ाच्या प्रारंभीच अनेक देशांमध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी फ्ल्यूची लस दिली जात आहे. दक्षिण कोरियात मागील महिन्यात 1.9 कोटी लोकांसाठी मोफत फ्ल्यू लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. लसविषयक पथकाचे नेतृत्व करणारे प्राध्यापक किम जून-कोन यांनी लसीकरण सुरक्षेसंबंधी लोकांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंतच्या परीक्षणात फ्ल्यू लसीमुळे काहीच घडले नसल्याचा निष्कर्ष निघाल्याचे त्यांनी म्हटले आहे.









