ऑनलाईन टीम / केपटाऊन :
आफ्रिकेतील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर ‘सीरम’ची लस परिणामकारक नसल्याने दक्षिण आफ्रिकेने कोरोनाचे पाच लाख डोस नाकारले. त्याचे पूर्ण पैसे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने परत केले आहेत.
दक्षिण आफ्रिकेचे आरोग्यमंत्री झ्वेली खिझे म्हणाले, दक्षिण आफ्रिकेने ‘सीरम’कडे कोरोना लसीच्या पाच लाख डोसची मागणी केली होती. मात्र, ही लस कोरोनाच्या नवीन स्ट्रेनवर प्रभावी नसल्याचे लक्षात येताच दक्षिण आफ्रिकेने ही लस नाकारली. त्यानंतर सीरमने आम्हाला पाच लाख डोसचे पैसे परत केले आहेत.
यापूर्वी आम्हाला मिळालेल्या 10 लाख लसी आम्ही आफ्रिकेतील इतर देशांना विकल्या. त्या वाया जाऊ दिल्या नाहीत. कारण त्या देशातील कोरोना विषाणूचे स्वरुप आमच्या देशातील विषाणूसारखे नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी ही लस प्रभावी ठरत आहे, असेही खिझे म्हणाले.









