खेडोपाडय़ात पसरला विषाणू, जगभरात 1 कोटी 8 लाखाहून अधिक रुग्ण, 5 लाख 20 हजार मृत्यू
वृत्तसंस्था/ प्रिटोरिया
दक्षिण आफ्रिका हा देश कोरोनाचा नवा हॉटस्पॉट ठरला आहे. या देशातील उदेकाचे वर्णन आता ‘महाउदेक’ असे करण्यात येत आहे. या देशातील केवळ शहरांमध्येच नव्हे तर खेडोपाडय़ातील लोक कोरोनाचे बळी ठरत असून राष्ट्रीय प्रशासनाने देशातील रुग्णालये वाईटातील वाईट परिस्थितीसाठी सज्ज केली आहेत.
दिवसागणिक अगणित रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये दाखल होत आहेत. उपलब्ध डॉक्टरांची संख्या कमालीची अपुरी पडत असून वैद्यकीय कर्मचाऱयांवरही अतिशय ताण पडत आहे. या ताणामुळे कित्येक वैद्यकीय कर्मचारी मानसिकदृष्टय़ा खचल्याची स्थिती आहे. अनेक डॉक्टर्स आणि कर्मचारी यांच्यावर मानसोपचार करण्याची वेळ प्रशासनावर आली असल्याचे सांगण्यात आले.
प्रतिदिन 7 हजार 500
गेला आठवडाभर रुग्णसंख्या दिवसाला सरासरी 7 हजार 500 च्या संख्येने वाढत आहे. या देशाची एकूण लोकसंख्या लक्षात घेता प्रतिदिन रुग्णसंख्या हाताबाहेर गेल्याची स्थिती आहे. आतापर्यंत 2 हजार 844 रुग्णांचा मृत्यू झाला असून आणखी किमान 10 हजार जण अत्यवस्थ अवस्थेत आहेत.
व्हेंटिलेटर्स अपुरे
दक्षिण आफ्रिकेने मार्चच्या अखेरीस 7 हजार व्हेंटिलेटर्सची व्यवस्था कोरोना रुग्णांसाठी विशेषत्वाने केली होती. तथापि, आगामी एक महिना सध्याचीच परिस्थिती राहिल्यास ही संख्या अपुरी पडेल, असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यामुळे नवे व्हेंटिलेटर्स आयात करण्याची योजना आहे. जून महिन्यात या देशात रुग्णसंख्या चौपटीने वाढली असून जुलैमध्ये ती त्याहीपेक्षा अधिक वाढेल, अशी स्थिती अपेक्षित धरण्यात येत आहे. अनेक शहरांमध्ये तात्पुरते वॉर्ड्स तयार करण्यात आले असून तेथे रुग्णांची सोय केली जात आहे. दक्षिण आफ्रिका आता आफ्रिका खंडात सर्वाधिक रूग्णांचा देश बनत आहे, असा इशारा देण्यात आला आहे.
जोंगने थोपटली स्वतःची पाठ

प्योगाँग :
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने कोरोना नियंत्रणात सर्वाधिक यश मिळविल्याचा दावा केला असून जगाने आपला आदर्श ठेवावा, अशी फुशारकीही मारली आहे. वर्कर्स पार्टीच्या पॉलिट ब्युरोमध्ये बोलताना त्याने कोरोनावर विजय मिळविल्याचा दावा केला. आपल्या सरकारने योग्य वेळी कठोर उपाययोजना केल्यामुळे या विषाणूचे प्रसरण थांबले. तसेच विदेशातून येणाऱया प्रवाशांकडून होणाऱया प्रसरणही थांबविण्यात यश आल्याचे त्याने सांगितले. आपल्या देशाचे हे ‘शायनिंग सक्सेस’ आहे, असाही दावा केला. परिस्थिती नियंत्रणात असल्याने अतिदक्षतेचा इशारा देण्याची कोणतीही आवश्यकता नाही. उत्तर कोरियात रुग्णसंख्या आणि मृतांची संख्या दोन्ही जगाच्या इतर देशांच्या तुलनेत अत्यल्प असल्याने काळजीचे कारण नसल्याचेही त्याने सांगितले.
रूग्णसंख्या 2.25 लाख

इस्लामाबाद
पाकिस्तानमध्ये रुग्णसंख्येत प्रतिदिन सरासरी साडेचार हजारांची वाढ होत असून शुक्रवारी रुग्णसंख्या 4 हजार 527 ने वाढली आहे. आता एकंदर रुग्णसंख्या 2 लाख 21 हजार 896 झाली असून 1 लाख 13 हजार 623 जण बरे झाल्याचा दावा तेथील सरकारने केला आहे. सर्वाधिक उदेक सिंध प्रांतात आहे. त्याखालोखाल पंजाब प्रांत आहे. सिंध प्रांतात एकंदर रुग्णसंख्या 78 हजार 225 असून पंजाबमध्ये ती 78 हजार 956 आहे. आतापर्यंत 4 हजार 551 जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी यापैकी 78 जण दगावले.
रशियात नवी लाट
मॉस्को :

मे मध्ये अचानकपणे रुग्णसंख्या वाढलेल्या रशियात आता कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याचे मानण्यात येत आहे. विमानतळांवरील ढिलाईमुळे विदेशातून आलेले कोरोनाग्रस्त सर्वसामान्य जनतेत मिसळल्याचा संशय व्यक्त होत आहे. रशियाने अजूनपर्यंत सर्व देशातील प्रवाशांवर बंदी घातलेली नाही. शुक्रवारी रुग्णसंख्येत 6 हजार 718 ची भर पडली असून एकंदर रुग्णसंख्या 6 लाख 67 हजार 883 इतकी झाली आहे. या देशात मृतांची एकंदर संख्या 60 हजाराहून अधिक झाली आहे. रशियन सरकारने सरकारी इमारतींमध्ये कोरोना रुग्णांसाठी वॉर्ड्स बनविले असून तेथे व्हेंटिलेटर्सची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
लॅटिन अमेरिकेत लाखावर बळी
मेक्सिको :
ब्राझिल, अर्जेंटिना, चिली, पेरु, उरुग्वे आणि मेक्सिको इत्यादी देशांनी बनलेल्या लॅटिन अमेरिकेत कोरोनाचे आतापर्यंत 1 लाखाहून अधिक बळी गेले आहेत. तसेच एकूण रुग्णसंख्या 25 लाखाहून अधिक आहे. यात एकटय़ा ब्राझिलमध्येच मृतांची संख्या 70 हजाराचा आकडा पार करेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. मेक्सिकोमध्येही 27 हजारांहून अधिक लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. पेरु या देशात 9 हजार बळी गेले आहेत.
अमेरिकेत उच्चांक

वॉशिंग्टन :
गुरुवार ते शुक्रवार या 24 तासांत अमेरिकेत 55 हजार 220 नवे कोरोना रुग्ण आढळून आल्याने नवा उच्चांक गाठला गेला आहे. बुधवारी 52 हजार 789 रुग्ण वाढले होते. गुरुवार ते शुक्रवार या कालावधीत फ्लोरिडा प्रांतात सर्वाधिक 10 हजार 109 नवे रुग्ण आढळले. टेक्सास प्रांतात 7 हजार 915 तर जॉर्जियामध्ये 3 हजार 472 नवे रुग्ण दाखल झाले. जॉर्जिया प्रांतात निर्बंध शिथिल केल्यानंतर रुग्णसंख्या अधिक वेगाने वाढली आहे. टेक्सास प्रांतात पुन्हा मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी या प्रांतात 7 हजार 915 नवे रुग्ण दाखल झाले. प्रशासनाने लॉकडाऊनचीही तयारी केली आहे.
पर्यटकांवरील निर्बंध रद्द

लंडन :
देशातील कोरोना परिस्थिती फारशी सुधारलेली नसतानाही ब्रिटनने विदेशी प्रवाशांवरील बंदी हटविण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिल, मे, जून आणि जुलै हे चार महिने या देशात पर्यटनाचे महिने म्हणून ओळखले जातात. त्यातील तीन महिने वाया गेले आहेत. यापैकी पहिले तीन महिने आता वाया गेले असले तरी जुलै आणि काही प्रमाणात ऑगस्टमध्ये उणीव भरून काढली जाऊ शकते, असे येथील प्रशासनाचे म्हणणे आहे. 10 जुलैपासून देशातील दहा मोठे विमानतळ विदेशी प्रवाशांकरिता खुले करण्यात येणार आहेत. ब्रिटनमधील नागरिकांवरील बंदीही या देशांनी काढून घ्यावी, असे आवाहन ब्रिटिश पंतप्रधानांनी केले आहे. विदेशी प्रवाशांवरील विलगीकरणाचे निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. थायलंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, तुर्कस्थान, बर्म्युडा आणि जिब्राल्टर या देशात जाण्यावरचे निर्बंधही हटविण्यात येणार आहेत.









