बेंगळूर/प्रतिनिधी
देशात कर्नाटक राज्यात ओमिक्रॉनचे पहिले दोन रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी एक रुग्ण परत विदेशात गेल्याचे समजत आहे. तसेच कोणत्याही प्रवाशाला त्यांचा कोरोना अहवाल आल्याशिवाय विमानतळ सोडण्याची परवानगी नाही, असं राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, ओमिक्रॉन प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे जगाची चिंता वाढली आहे. परंतु कर्नाटकात दोन रुग्ण सापडुनही प्रशासनाचा प्रशासनाचा मात्र हलगर्जीपणाचा कळस दिसून आला आहे. राज्यात सापडलेला देशातला पहिला ओमायक्रॉन बाधित रुग्ण रुग्णालयात दाखल करुनही रातोरात दुबईला पळून गेल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेतून परतलेले तब्बल १० प्रवासी विमानतळावरची अनिवार्य कोरोना चाचणी न करता बेपत्ता झाल्याचं समोर येत आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारचे धाबे दणाणले आहे.
दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या आणि बेपत्ता झालेल्या या १० लोकांशी कसल्याही प्रकारे संपर्क होऊ शकला नाही, त्यांचे फोनही बंद आहेत, त्यामुळे या १० जणांना बेपत्ता घोषित केलं आहे. बेंगळूर विमानतळावर कडेकोट बंदोबस्त असूनही अनिवार्य असलेली कोविड चाचणी चुकवत या १० जणांनी तिथून पळ काढला आहे. हे १० जण नक्की कसे काय सुटून गेले याबद्दल प्रशासन सध्या गोंधळात आहे. तसेच विमानतळावरील सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. मात्र या प्रकारामुळे संतप्त झालेले राज्याचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी आजच्या रात्रीतच या प्रवाशांना शोधून काढण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
बेंगळूर विमानतळावर परतलेले १० जण बेपत्ता झाल्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही ही परिस्थिती समजावून घेण्यासाठी तात्काळ उच्चस्तरीय बैठक बोलावली. या बैठकीत बोलताना राज्याचे महसूल मंत्री आर. अशोक यांनी सांगितलं की बेपत्ता झालेले हे १० लोक रात्रभरात सापडायला हवेत आणि त्यांच्या चाचण्याही झाल्या पाहिजेत. कोणत्याही प्रवाशाला त्यांचा कोरोना अहवाल आल्याशिवाय विमानतळ सोडण्याची परवानगी नाही. त्यामुळे जे १० लोक बेपत्ता आहेत त्यांना शोधताना मात्र प्रशासनाचा कस लागणार आहे.