वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
रविवारी येथे सुरू असलेल्या दुसऱया वनडे सामन्यात नवा कर्णधार बेवुमाच्या शानदार खेळीच्या जोरावर यजमान दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांत 6 बाद 341 धावा जमवित पाकला विजयासाठी 342 धावांचे आव्हान दिले. बेवुमाने तसेच डिकॉक, व्हान डर डय़ुसेन आणि मिलर यांनी शानदार अर्धशतके झळकविली. शेवटची बातमी हाती आली त्यावेळी पाकने 10 षटकांत 2 बाद 70 धावा जमविल्या होत्या.
या वनडे मालिकेतील सलामीचा सामना पाकने जिंकून दक्षिण आफ्रिकेवर यापूर्वीच आघाडी घेतली आहे. पाकने या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजी दिली. या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्याच्या तुलनेत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीमध्ये दुसऱया सामन्यात खूपच बदल जाणवला. डिकॉक आणि मार्करम यांनी सलामीच्या गडय़ासाठी 9.3 षटकांत 57 धावांची भागिदारी केली. पाकच्या अश्रफने मार्करमला झेलबाद केले. त्याने 34 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 39 धावा जमविल्या. कर्णधार बेवुमा आणि डिकॉक यांनी संघाचा डाव सावरताना दुसऱया गडय़ासाठी 114 धावांची शतकी भागिदारी नोंदविली. रॉफच्या गोलंदाजीवर डिकॉकचा त्रिफळा उडाला. त्याने 86 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांसह 80 धावा जमविल्या. डिकॉक बाद झाल्यानंतर कर्णधार बेहुमाला व्हॅन डेर डय़ुसेनकडून चांगली साथ मिळाली. या जोडीने तिसऱया गडय़ासाठी 99 धावांची भर घातली. डेसनेनने डय़ुसेनला झेलबाद केले. त्याने 37 चेंडूत 4 षटकार आणि 6 चौकारांसह 60 धावा फटकावल्या. बेवुमाचे शतक 8 धावांनी हुकले. रॉफने त्याला झेलबाद केले. बेवुमाने 102 चेंडूत 9 चौकारांसह 92 धावा जमविल्या. मिलरने 27 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 50 धावा जमविल्याने दक्षिण आफ्रिकेला 341 धावापर्यंत मजल मारता आली. क्लेसन 11 तर फेहलुक्वायो 3 धावावर बाद झाले. दक्षिण आफ्रिकेच्या डावात 10 षटकार आणि 34 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे हॅरीस रॉफने 54 धावांत 3 तर शाहीन आफ्रिदी, हसनेन आणि आश्रफ यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
पाकच्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. दक्षिण आफ्रिकेच्या एन्गिडीने सलामीच्या इमाम उल हकला 5 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर नॉर्जेने कर्णधार बाबर आझमला झेलबाद करून पाकवर दडपण आणले. आझमने 33 चेंडूत 6 चौकारांसह 31 धावा जमविल्या. फक्र झमान 5 चौकारांसह 25 धावांवर खेळत होता. पाकने 10.4 षटकांत 2 बाद 70 धावा जमविल्या होत्या.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका 50 षटकांत 6 बाद 341 (बेवुमा 92, डिकॉक 80, मार्करम 39, व्हान डर डय़ुसेन 60, मिलर नाबाद 50, क्लेसन 11, फेहलुक्वायो 3, हॅरीस रॉफ 3-54, शाहीन आफ्रिदी 1-75, हसनेन 1-74, आश्रफ 1-62).
पाक 10.4 षटकांत 2 बाद 70 (इमाम उल हक 8, बाबर आझम 31, झमान खेळत आहे 25, एन्गिडी 1-32, नॉर्जे 1-2).
(धावफलक अपूर्ण)









