वृत्तसंस्था/ केबेरा
येथे सुरू असलेल्या दुसऱया आणि शेवटच्या क्रिकेट कसोटीवर यजमान दक्षिण आफ्रिकेने आपली पकड अधिक मजबूत केली आहे. रविवारी खेळाच्या तिसऱया दिवशी दक्षिण आफ्रिकेने शेवटची बातमी हाती आली त्यावेळी दुसऱया डावात 3 बाद 91 धावा जमवित बांगलादेशवर 327 धावांची भक्कम आघाडी मिळविली आहे.

या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने पहिल्या डावात 453 धावा जमविल्यानंतर बांगलादेशने 5 बाद 139 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरूवात केली आणि त्यांचा पहिला डाव 74.2 षटकांत 217 धावांत आटोपला. बांगलादेशच्या डावामध्ये तमीम इक्बालने 8 चौकारांसह 47, नजमुल हुसेनने 6 चौकारांसह 33, मुश्फीकुर रहीमने 8 चौकारांसह 51, यासीर अलीने 7 चौकारांसह 46, दास आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी 11 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेतर्फे हार्मर आणि मुल्डेर यांनी प्रत्येकी 3 तर ऑलिव्हर व केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशवर पहिल्या डावात 236 धावांची आघाडी मिळविली.
दक्षिण आफ्रिकेने दुसऱया डावात 21 षटकांत 3 बाद 91 धावा जमविल्या होत्या. इर्वीने 5 चौकारांसह 41, कर्णधार एल्गारने 1 षटकार आणि दोन चौकारांसह 26, के.पीटरसनने 2 चौकारांसह 14 धावा जमविल्या. बांगलादेशतर्फे टी. इस्लाम दोन तर खालीद अहमदने 1 गडी बाद केला. दक्षिण आफ्रिकेने 327 धावांची आघाडी घेतली आहे. या मालिकेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने मोठय़ा फरकाने जिंकून बांगलादेशवर आघाडी मिळविली आहे.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका प. डाव- 136.2 षटकांत सर्वबाद 453, बांगलादेश प.डाव-74.2 षटकांत सर्वबाद 217 (मुश्फीकुर रहीम 51, तमीम इक्बाल 47, नजमुल हुसेन 33, यासीर अली 46, दास 11, मेहदी हसन मिराज 11, हार्मर 3-39, मुल्डेर 3-25, ऑलिव्हर 2-39, केशव महाराज 2-57), दक्षिण आफ्रिका दु. डाव- 21 षटकांत 3 बाद 91 (इर्वी 41, एल्गार 26, के.पीटरसन 14, टी.इस्लाम 2-31, खालीद अहमद 1-20)
(धावफलक अपूर्ण)









