वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च
येथे सुरू असलेल्या दुसऱया आणि शेवटच्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा संघ यजमान न्यूझीलंडवर विजय मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला निर्णायक विजयासाठी 425 धावांचे कठीण आव्हान दिले असून न्यूझीलंडने दुसऱया डावात 4 बाद 94 धावा जमविल्या आहेत. या कसोटीतील खेळाचा शेवटचा दिवस बाकी असून न्यूझीलंडचा संघ हा सामना अनिर्णित राखण्यासाठी प्रयत्न करेल.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 364 धावा जमविल्यानंतर न्यूझीलंडचा पहिला डाव 293 धावांत आटोपला. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 71 धावांची आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेने 5 बाद 140 या धावसंख्येवरून दुसऱया डावाला पुढे सुरूवात केली आणि त्यांनी 100 षटकांत 9 बाद 354 धावांवर डाव घोषित करून न्यूझीलंडला निर्णायक विजयासाठी 425 धावांचे आव्हान दिले. चहापानापूर्वी दक्षिण आफ्रिकेने दुसऱया डावाची घोषणा केली. व्हेरेनने नाबाद शतक झळकविताना 187 चेंडूत 1 षटकार आणि 16 चौकारांसह 136 धावा झळकविल्या. रबाडाने 34 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांसह 47 धावांची जलद खेळी केली. व्हेरेनने मुल्डेरसमवेत 78 धावांची तर रबाडासमवेत पुन्हा 78 धावांची भागिदारी केली. मुल्डेरने 4 चौकारांसह 35 धावा जमविल्या. व्हेरेनने 158 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक आणि फलंदाज डी कॉकने अनपेक्षित निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर व्हेरेनला संघात संधी देण्यात आली. त्याने आतापर्यंत 5 कसोटी सामने खेळले आहेत. मायदेशात भारताविरूद्ध एक कसोटी तर त्यानंतर विंडीजविरूद्ध दोन कसोटी आणि न्यूझीलंडविरूद्ध दोन कसोटी खेळल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱया डावात न्यूझीलंडतर्फे साऊदी, हेन्री, जेमिसन आणि वॅग्नर यांनी प्रत्येकी दोन तर ग्रॅण्डहोमने एक गडी बाद केला.
चहापानानंतरच्या शेवटच्या सत्रात न्यूझीलंडचे फलंदाज खेळपट्टीवर टिकून राहण्यासाठी झगडत होते. दक्षिण आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडने दुसऱया डावात 42 षटकांत 4 बाद 94 धावा जमविल्या होत्या. रबाडाने आपल्या पहिल्याच षटकांत सलामीच्या यंगला खाते उघडण्यापूर्वी झेलबाद केले. त्यानंतर त्याने कर्णधार लॅथमला एका धावेवर बाद केले. केशव महाराजने निकोल्स आणि मिचेल यांना त्रिफळाचीत केले. निकोल्सने 7 तर मिचेलने 2 षटकार आणि 2 चौकारांसह 24 धावा जमविल्या. कॉनवे 8 चौकारांसह 60 धावांवर खेळत आहे. दक्षिण आफ्रिकेतर्फे रबाडा आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन बळी मिळविले आहेत.
मंगळवारी न्यूझीलंड संघाला विजयासाठी 332 धावांची जरूरी असून त्यांचे सहा गडी खेळावयाचे आहेत. न्यूझीलंड संघाने या मालिकेतील पहिला सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेवर आघाडी मिळविली होती. ही दुसरी कसोटी अनिर्णित राहिल्यास न्यूझीलंड तब्बल 19 वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेवर कसोटी मालिकाविजय मिळवेल. पण दक्षिण आफ्रिका संघाची स्थिती भक्कम असून ते ही मालिका बरोबरीत राखतील.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका प. डाव 133 षटकांत सर्वबाद 364, न्यूझीलंड प.डाव 80 षटकांत सर्वबाद 293, दक्षिण आफ्रिका दु. डाव 100 षटकांत 9 बाद 354 डाव घोषित (व्हेरेन नाबाद 133, मुल्डेर 35, व्हॅन डेर डय़ुसेन 45, बवुमा 23, रबाडा 47, साऊदी, हेन्री, जेमिसन, वॅग्नर प्रत्येकी दोन बळी, ग्रॅण्डहोम 1-16), न्यूझीलंड दु. डाव 42 षटकांत 4 बाद 94 (कॉनवे खेळत आहे 60, लॅथम 1, यंग 0, निकोल्स 7, मिचेल 24, ब्लंडेल खेळत आहे 1, रबाडा 2-17, केशव महाराज 2-32).









