वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर जाणार आहे. उभय संघांमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जात असून या मालिकेसाठी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने सोमवारी सोळा जणांचा संघ जाहीर केला. या मालिकेतील पहिली कसोटी ब्रिस्बेनच्या गब्बा मैदानावर 17 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
या मालिकेसाठी घोषित करण्यात आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघात 22 वषीय वेगवान गोलंदाज गेरार्ड कोझे या नव्या चेहऱयाचा समावेश करण्यात आला आहे. कोझेने अलीकडच्या कालावधीत आपल्या कामगिरीत सातत्य राखले असून त्याने 28.82 धावांच्या सरासरीने 40 बळी विविध स्पर्धांमध्ये मिळविले आहेत. तसेच त्याने तेरा प्रथमश्रेणी सामन्यात खेळताना 47 धावात 4 ही सर्वोच्च कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिका कसोटी संघामध्ये 2019 नंतर थेनिस ब्रुयेनचे पुनरागमन झाले आहे. ब्रुयेनने यापूर्वी बारा कसोटीत दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले आहे. व्हॅन डेर डय़ुसेनलाही संघात स्थान देण्यात आले आहे. केशव महाराजला यापूर्वी दुखापत झाली होती. आता ती बरी होण्याच्या मार्गावर असल्याने त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. डीन एल्गारकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले असून बेहुमा उपकर्णधार म्हणून राहील.
दक्षिण आफ्रिका कसोटी संघ- डीन एल्गार (कर्णधार), बेहुमा (उपकर्णधार), गेरार्ड कोझी, डी बुयेन, सॅरेल, इर्व्ही, सायमन हार्मेर, जेनसेन, क्लेसन, केशव महाराज, एन्गिडी, नॉर्जे, रबाडा, स्टुर्मन, व्हॅन डेर डय़ुसेन, व्हेरेनी आणि झोंडो.









