केशव महाराजची हॅट्ट्रिक, रबाडा ‘सामनावीर’, विंडीजचा ‘व्हाईटवॉश’
वृत्तसंस्था/ ग्रोस आयलेट
दक्षिण आफ्रिकेने यजमान विंडीजचा दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ‘व्हाईटवॉश’ केला. येथे सोमवारी झालेल्या दुसऱया आणि शेवटच्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने विंडीजचा 158 धावांनी दणदणीत पराभव केला. दक्षिण आफ्रिका संघातील फिरकी गोलंदाज केशव महाराजने हॅट्ट्रीकसह 36 धावांत 5 गडी बाद केले. दक्षिण आफ्रिकेच्या रबाडाला ‘सामनावीर’ तर डि कॉकला ‘मालिकावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
दक्षिण आफ्रिकेने दुसरी आणि शेवटची कसोटी खेळाच्या चौथ्या दिवशी चहापानापूर्वीच जिंकली. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 298 धावा जमविल्यानंतर विंडीजचा पहिला डाव 149 धावांत आटोपल्याने दक्षिण आफ्रिकेने 149 धावांची आघाडी मिळविली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दुसऱया डावात 174 धावा जमवित विंडीजला विजयासाठी 324 धावांचे आव्हान दिले. विंडीजने बिन बाद 15 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरूवात केली आणि दक्षिण आफ्रिकेच्या अचूक गोलंदाजीसमोर त्यांचा दुसरा डाव 58.3 षटकांत 165 धावांत आटोपला. किरेन पॉवेलने 116 चेंडूत 9 चौकारांसह 51, मेयर्सने 56 चेंडूत 4 चौकारांसह 34, ब्लॅकवूडने 63 चेंडूत 1 चौकारांसह 25 आणि रॉशने 63 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 27 धावा जमविल्या. रेबाडाने 44 धावांत 3 तर केशव महाराजने 36 धावांत 5 आणि एन्गिडीने 1 गडी बाद केला.
दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराजने उपाहारापूर्वीच्या खेळातील दुसऱया षटकामध्ये हॅट्ट्रीक साधली. त्याने किरेन पॉवेल, होल्डर आणि डिसिल्वा यांना सलग तीन चेंडूवर बाद केले. पहिला तर गेल्या 60 वर्षांच्या कालावधीत कसोटी हॅट्ट्रीक नोंदविणारा केशव महाराज हा दक्षिण आफ्रिकेचा पहिला तर एकूण दुसरा गोलंदाज ठरला आहे. केशव महाराजच्या या षटकात पॉवेल नॉर्त्जेकरवी त्यानंतर दुसऱया चेंडूवर होल्डरला पीटरसनकरवी आणि तिसऱया चेंडूवर डिसिल्वाला मुल्डेरकरवी झेलबाद केले. विंडीजचा चेस दुखापतीमुळे फलंदाजी करू शकला नाही. उपाहारावेळी विंडीजची स्थिती 6 बाद 109 अशी केविलवाणी झाली होती. त्यानंतर विंडीजचे शेवटचे तीन फलंदाज अधिक धावा जमू शकले नाहीत. दक्षिण आफ्रिकेने 2017 च्या मार्चनंतर विदेशात पहिलीच कसोटी मालिका जिंकली आहे. कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर डीन एल्गार दक्षिण आफ्रिकेला पहिली कसोटी मालिका जिंकून दिली आहे.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका प. डाव सर्वबाद 298, विंडीज प. डाव- सर्वबाद 149, दक्षिण आफ्रिका दु. डाव सर्वबाद 174, विंडीज दु. डाव- 58.3 षटकांत सर्वबाद 165 ( पॉवेल 51, मेयर्स 34, रॉच 27, ब्लॅकवूड 25, केशव महाराज 5-36, रबाडा 3-44, एन्गिडी 1-29).









