वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
यजमान दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ‘व्हाईटवॉश’ केला. दुसऱया कसोटीतील मंगळवारी तिसऱया दिवशी दक्षिण आफ्रिकेने लंकेचा 10 गडय़ांनी पराभव करत ही मालिका 2-0 अशी एकतर्फी जिंकली. लंकेचा कर्णधार करूणारत्नेचे या सामन्यातील चिवट शतक वाया गेले.
या दुसऱया सामन्यात लंकेचा पहिला डाव 157 धावांवर आटोपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 302 धावा जमवित 145 धावांची आघाडी मिळविली. त्यानंतर लंकेने 4 बाद 150 या धावसंख्येवरून मंगळवारी तिसऱया दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचा दुसरा डाव 56.5 षटकांत 211 धावांत आटोपला. दक्षिण आफ्रिकेला निर्णायक विजयासाठी 67 धावांची जरूरी होती. दक्षिण आफ्रिकेने दुसऱया डावात 13.2 षटकांत बिनबाद 67 जमवित लंकेचा 10 गडय़ांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने ही दुसरी कसोटी अडीच दिवसांत जिंकली.
लंकेच्या दुसऱया डावात कर्णधार करूणारत्नेने शानदार शतक झळकविले. 91 धावांवर नाबाद राहिलेल्या करूणारत्नेने मंगळवारी आपले कसोटीतील 10 वे शतक 123 चेंडूत पूर्ण केले. शतक झाल्यानंतर तो नॉर्त्जेच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. करूणारत्नेने 128 चेंडूत 19 चौकारांसह 103 धावा झळकविल्या. थिरिमनेने 7 चौकारांसह 31 तर डिक्वेलाने 6 चौकारांसह 36 आणि डिसिल्वाने 2 चौकारांसह 16 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेतर्फे एन्गिडीने 4, सिपम्लाने 3, नॉर्त्जेने 2 व मुल्डरने 1 गडी बाद केला. पहिल्या डावात शतक झळकविणाऱया एल्गारने संघाच्या दुसऱया डावात मार्करमसमवेत अभेद्य 67 धावांची भागिदारी करताना 5 चौकारांसह नाबाद 31 धावा जमविल्या. त्याला मालिकावीराचा बहुमान मिळाला. मार्करमने 4 चौकारांसह नाबाद 36 धावा केल्या.
लंकेचा दक्षिण आफ्रिका दौरा संपुष्टात आला असून आता इंग्लंडचा संघ लंकेत दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी दाखल झाला आहे. उभय संघातील पहिली कसोटी 14 जानेवारीपासून गॅले येथे सुरू होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ आता तब्बल 14 वर्षांनंतर पाकच्या दौऱयावर जाणार आहे. या दौऱयामध्ये उभय संघात दोन कसोटी आणि तीन टी-20 सामने होणार आहेत.
संक्षिप्त धावफलक : लंका प. डाव- 157, दक्षिण आफ्रिका प. डाव 302, लंका दु. डाव 56.5 षटकांत सर्वबाद 211 (करूणारत्ने 103, डिक्वेला 36, थिरिमने 31, डिसिल्वा 16, एन्गिडी 4-44, सिपम्ला 3-40, नॉर्त्जे 2-64, मुल्डर 1-52), दक्षिण आफ्रिका दु. डाव 13.2 षटकांत बिनबाद 67 (मार्करम नाबाद 36, एल्गार नाबाद 31).









