क्रिकेटचा दर्जा आणि रचना यावर कळस चढवणारा अद्वितीय कर्णधार म्हणून जागतिक क्रिकेटला महेंद्रसिंह धोनीची ओळख ठेवावी लागणार आहे. शालेय जीवनात फुटबॉलचा गोलकीपर असताना शिक्षकाच्या आग्रहावरून क्रिकेटकडे वळणाऱया धोनीने विकेट कीपर आणि चतुरस्र कर्णधार म्हणून आपला कायमचा ठसा उमटवून क्रिकेटचा निरोप घेतला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या सायंकाळी त्याने सर्व क्रिकेटप्रेमींना निवृत्तीचा अनपेक्षित धक्का दिला. कोरोनामुळे सारे विश्व थंडावले असताना हा थंड डोक्मयाचा विजेता इतक्मया सहजपणाने निवृत्त झाला की त्या घोषणेवर कोणाचा विश्वासही बसू नये. पण त्यानेच केलेल्या ट्विटवर विश्वास ठेवणे भाग पडले. पाठोपाठ सुरेश रैनानेही अलविदा म्हटले. क्रिकेटमधली ही जय-विरूची जोडी एकाच दिवशी निवृत्त झाली. महेंद्रसिंग धोनी नावातच ‘सिंग इज किंग’ची झलक दिसून येत होती. बाहुबली या बहुचर्चित प्रचंड यशस्वी भारतीय सिनेमाला आपल्या नायकाचे नाव महेंद्र बाहुबली ठेवावे असे वाटावे यातच त्याच्या नावाचा, त्याच्या जनमानसात असलेल्या प्रतिमेचा, लोकप्रियतेचा आणि ‘हेलिकॉप्टर शॉट’ मागील शक्ती आणि युक्तीचा प्रत्यय यावा. भारतीय क्रिकेट 1990 नंतर बाळसे धरू लागले. 1983 साली कपिलदेवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने विश्वचषक जिंकून आपल्या आकांक्षा व्यक्त केल्या. मात्र सौरभ गांगुलीने जिंकण्याची ईर्षा संघात जागवली तर विजीगिषु वृत्तीचा धोनी आला आणि मोठा बदल घडला. सलामीला येऊन विजयाचा पाया गांगुलीने रचावा आणि अखेरच्या क्षणी येऊन जय पराजयाचे हेलकावे खाणारा सामना भारताच्या बाजूने झुकवून धोनीने तो खिशात घालावा हे समीकरण झाले. दोघात फरक इतकाच की गांगुलीचा आक्रमकपणा त्याच्या नेतृत्वात दिसायचा. धोनीचा आक्रमकपणा हा सामना जिंकल्यानंतर समजून यायचा! गांगुली, तेंडुलकर, कुंबळे, लक्ष्मण हे सर्व दिग्गज जेव्हा तिशी पार करून खेळत होते तेव्हा धोनी 2004 साली भारतीय संघात आला. पहिले कसोटी आणि वनडे शतक करण्यासाठी त्याला पाचव्या सामन्याची वाट पहावी लागली. अर्थात त्या तुलनेने सचिनला 79 व्या डावाची वाट पहावी लागली होती. पण जसे 2007 च्या टी-20 खेळापासून क्रिकेटने कात टाकली, तसे भारताला नव्या उमद्या चेहऱयांची गरज भासू लागली. सचिन, सौरभ, कुंबळे, द्रविड नव्या रचनेत बसणारे खेळाडू नव्हतेच. त्यामुळे धोनीला थेट नेतृत्वाची संधी मिळाली. हा देशासह त्याच्यासाठीही धक्का होता. पण यष्टीमागील त्याचे कर्तृत्व आणि आक्रमक शैली लक्षात घेऊन सचिनसारख्या दिग्गजाने धोनीकडे नेतृत्व सोपविण्याची सूचना केली होती. ती मंडळाने मान्यही केली. 2007 सालचा टी-20 विश्वकप धोनीने ज्या पद्धतीने जिंकला त्यामुळे पुढची काही वर्षे हा सूर्य क्रिकेटच्या आसमंतात तळपणार याची झलक दिसली होती. यातील पहिला आणि शेवटचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी झाला होता. पहिला टायब्रेकमुळे पाच गोलंदाजानी नुसत्या यष्टी उडवून जिंकायचा होता. पाकिस्तानने पारंपरिक गोलंदाजाना तर धोनीने वीरेंद्र सेहवाग, हरभजन, रॉबिन उथप्पा यांना चेंडू सोपवले. त्यांनी पाकिस्तानला चीत केले आणि धोनीचे कौशल्य उजळले. हातातून गेलेल्या अंतिम सामन्यात जोगिंदर शर्माला अनपेक्षितरित्या शेवटचे षटक सोपवून त्याने बाजी उलटवली. दोन्ही सामन्यातील धोनीची नेतृत्वाची चुणूक डोळे दिपवणारीच होती. 2007 ला टी-20 वर्ल्ड कपचे नेतृत्व केल्यानंतर धोनीने गेली 12 वर्ष मागे वळून पाहिलेले नाही. केवळ 15-16 वर्षाची त्याची कारकीर्द पण टी-20 पाठोपाठ वनडे आणि कसोटीचे नेतृत्व त्याच्याकडे चालून आले. विशेष म्हणजे सचिन, राहुल, सौरभ, कुंबळे हे चार माजी कर्णधार कसोटीत त्याच्या नेतृत्वाखाली लढत होते हा एक चमत्कारच होता. तरीही धोनीने या प्रत्येकाला त्याचा सन्मान दिला आणि सन्मानाने त्याना निवृत्त करण्यासही सहकार्य केले. 2008 साली त्याच्याच नेतृत्वाखाली पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मायभूमीत पराभूत केले. आयसीसीने त्याला दोन वेळा सर्वोत्तम क्रिकेटपटूचा सन्मान दिला. त्याशिवाय आयसीसीच्या क्रमवारीमध्येही त्याने स्थान मिळवले होते. महेंद्रसिंग धोनीने भलेही बॅटने मोठय़ा शतकांच्या राशी रचल्या नसतील मात्र तब्बल बारा वेळा षटकार ठोकून सामना जिंकून देणारा तो एकमेव फलंदाज आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहा मोठय़ा स्पर्धांच्या अंतिम सामन्यात नेतृत्व करणाराही तो एकटाच. भल्या भल्या अद्वितीय फलंदाज म्हणून गणल्या गेलेल्या कर्णधारांनाही ती जमलेली नाही. 2007 चा ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप, 2011 चा विश्वचषक आणि 2013 चा चॅम्पयिन्स चषक असे तीन चषक उंचावण्याचा मान मिळालेला तो एकमेव कर्णधार. कसोटीचा अजिंक्मय संघ म्हणूनही त्याच्या नेतृत्वात भारताने लख्ख यश मिळवले. असे अनेक धक्कादायक योगायोग धोनीच्या कारकिर्दीत आहेत. त्यातील एक सर्वात महत्त्वाचा योगायोग म्हणजे त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात धावबादने झाली होती अन कारकिर्दीची अखेर ही धावबादनेच झाली. गेले वर्षभर ही कारकीर्द ‘टू बी ऑर नॉट टू बी’ यात हेलकावे खात होती त्याच्यावर अनेक मतमतांतरे जाहीररीत्या व्यक्त होत होती. मात्र नेहमीच अबोल असणाऱया धोनीने कुणालाही ताकास तूर लागू न देता आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची एक्झिट केली. तोही क्षण त्याच्या अनाकलनीय हेलिकॉप्टर शॉटसारखाच होता. भारतीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात महेंद्रसिंग धोनी एक दंतकथा बनून राहील यात शंका नाही. झारखंडसारख्या अल्प सुविधा मिळणाऱया भागात तो घडला. अशा भागातून येत भारतीय क्रिकेट इतिहासावर त्याने आपला अमीट ठसा उमटवला आहे. त्याची पुढची कारकीर्दही देशास नवी दिशा देणारी ठरो.
Previous Article‘ सीपीआर’ मध्ये कोरोना रूग्णांसाठी जंम्बो ऑक्सिजन टँक
Next Article सांगली जिल्हय़ात 11 जणांचा मृत्यू ,301 नवे रूग्ण
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.