निपाणी पोलिसांचा अजब कारभार : गळतगा येथील मास्क न वापरणाऱयांना जत्राट ग्रा.पं.ची पावती : वाहनधारकांतून संताप
वार्ताहर/ खडकलाट
गेल्या चार दिवसापासून संपूर्ण भारतात अनलॉक 5 ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यानुसार वाहनधारक असो वा पादचारी मास्क न वापरणाऱया व्यक्तींच्यावर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करून त्यांच्याकडून पाचशे रुपये दंड आकारण्यात येत आहेत. पण निपाणी पोलिसांनी मास्क न वापरणाऱया व्यक्तींकडून दंड म्हणून रक्कम घेऊन त्याची पावती देतेवेळी मात्र जत्राट ग्रामपंचायतीच्या पाणीपट्टी, घरपट्टी व इतर शुल्क आकारणीची पावती वाहनचालकांना देऊन अजब कारभार चालविला आहे. यामुळे वाहनधारकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
निपाणी-अकोळ मार्गावरील हालसिद्धनाथ मंदिराजवळ बसवेश्वर पोलीस स्थानकाचे काही पोलीस कर्मचारी वाहनधारकांना अडवून मास्क तपासणी करीत आहेत. यावेळी मास्क न वापरणाऱयांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. रविवार दि. 5 रोजी तीन पोलीस कर्मचाऱयांनी गळतगा येथील एका वाहनधारकाला अडवून मास्कची विचारणा केली. सदर वाहनधारक मास्क न घातल्यामुळे त्याच्याकडे शंभर रुपयाची मागणी केली. शंभर रुपये दिल्यानंतर सदर व्यक्तीला ग्रामपंचायत जत्राटची घरपट्टी, पाणीपट्टी, सार्वजनिक वाचनालय पट्टी, दिवा पट्टी असे फाळा भरणारी पावती त्या व्यक्तीला देण्यात आली. सदर पावती पोलीस स्थानकाची नसून ग्रामपंचायत जत्राटची आहे. असे सांगून देखील सदर पोलीस कर्मचाऱयांनी त्याला दमदाटी करून धुडकावून लावले.
त्यावेळी सदर व्यक्ती पोलिसांच्या या अजब कारभारामुळे संतप्त झाला. मास्क न वापरणाऱया व्यक्तींच्यावर कारवाई करून त्यांच्याकडून जी रक्कम वसुली करण्यात येते ती रक्कम सरकारला जमा व्हावी. असाच उद्देश या पाठीमागे असताना ग्रामपंचायत जत्राटच्या रशीदीतील पावती देऊन पोलीस कर्मचाऱयांकडून राजरोसपणे वाहनधारकांची लूट करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा पोलीसप्रमुखांनी याकडे ताबडतोब लक्ष देऊन मास्क न वापरणाऱया वाहनधारकांच्यावर करण्यात येणाऱया या कारवाईतील भ्रष्टाचाराला आळा घालावा. संबंधित पोलीस स्थानकाच्या पोलिसांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी वाहनधारकांतून करण्यात येत आहे. शिवाय जत्राट ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱयांच्यावर ही कायदेशीर कारवाई करावी. कारण पोलीस प्रशासनाकडून मास्क न वापरणाऱया व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी ग्रामपंचायतीच्याकडून रशीद पावती पुस्तक देण्यात आल्याने संबंधित कर्मचाऱयांवर ही कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात येत आहे.









