स्थानिक नागरिकांनी आग विझवली
प्रतिनिधी / मिरज
मिरज तालुक्यातील भोसे गावच्या हद्दीत दंडोबा डोंगरावर रविवारी दुपारी अचानक वणवा पेटला. सुमारे 5 एकर परिसरात वाऱ्याच्या वेगाने पसरलेल्या आगीमुळे पूर्ण वाढ झालेली हजारो झाडे आणि जनावरांचा चारा जळून खाक झाला. डोंगरावर धुराचा लोट उठल्यानंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. सुमारे तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. मात्र डोंगरावर आग लागण्याचे नेमके कारण समजू शकले नाही.
दंडोबा डोंगराच्या खालील बाजूस हत्तीवाट येथे प्रचंड जंगली झाडे आहेत. या झाडांमधूनच रविवारी दुपारी दीडच्या सुमारास धुराचे लोट दिसत होते. पंचायत समितीचे सदस्य कृष्णदेव कांबळे यांनी ग्रामस्थांना याची माहिती दिली. त्यानंतर कांबळे आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी दंडोबा डोंगरावर जाऊन पाहणी केली असता सुमारे पाच एकर परिसरात आग पसरली होती. अनेक मोठी झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती.
यावेळी ग्रामस्थांनी वन विभाग आणि अग्निशामक विभागाला याची माहिती दिली. तोवर आगीने रौद्ररूप धारण केले होते. त्यामुळे ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी उपाययोजना केल्या. डोंगरावर पाणी नसल्याने ओला गवत, माती घेऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. दीड वाजता लागलेली ही आग साडेचार वाजता आटोक्यात आली. या आगीत सुमारे एक हजार झाडे जळून खाक झाल्याचा अंदाज ग्रामस्थांनी वर्तविला आहे. दरम्यान ही आग कशामुळे लागली, याचे नेमके कारण समजू शकले नाही.








