घनकचरा व्यवस्थापनामध्ये चांगले बदल आणत आहोत
प्रतिनिधी / मालवण:
प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईबाबत अद्याप आम्हाला कोणतीही कल्पना पालिका प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही. मालवण शहरातील घनकचरा व्यवस्थापनामध्ये सुसुत्रता आणण्यासाठी आम्ही चांगल्याप्रकारे यशस्वी ठरण्याचे प्रयत्न करीत आहोत. तरीही जर प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही सूचना केल्या असतील, तर त्यानुसार घनकचरा व्यवस्थापनाच्या कार्यवाहीत बदल करण्यासाठी आम्ही कार्यवाही करू, असे मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी सांगितले. दंडाबाबत अद्याप काहीही कल्पना आपल्याला नाही. मुख्याधिकारीही अद्याप हजर झालेले नाहीत. मुख्याधिकारी हजर झाल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणते पत्र आले असल्यास आम्ही त्यावर चौकशी करून निर्णय घेऊ. सध्यातरी घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा अपुरी पडत असल्याने त्या ठिकाणी नवीन जागा लागूनच खरेदी करण्यात आलेली आहे. आता बायोमायनिंगही सुरू करण्यात आले आहे. यातून बऱयापैकी घनकचऱयाची समस्या सुटण्याची शक्यता आहे. शासनाकडून देण्यात आलेल्या निर्देशानुसार मालवण पालिका कार्यवाही करण्यासाठी तत्पर आहे. तरीही प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनांचेही पालन करण्यात येईल, असेही नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी स्पष्ट केले.









