वार्ताहर /निपाणी :
अतिरिक्त वीज वापरल्याप्रकरणी चिकोडीच्या भरारी पथकाने 2100 रुपयांची दंडात्मक कारवाई केली. या कारवाईची नोटीस निपाणी हेस्कॉम कार्यालयातर्फे ग्राहकापर्यंत पोहचविण्यात आली. पण 2100 रुपये दंड असताना त्यापुढे एक हा वाढविताना 12 हजार 100 रु. इतका दंड झाल्याचे दाखविण्यात आले. सुज्ञ वीज ग्राहकाने यासाठी व्यवस्थित पाठपुरावा करताना अधिकाऱयांकडून दंडात्मक कारवाईतून वरकमाई करण्याचा भांडाफोड केला. गुरुवारी हा प्रकार उघडकीस येताच हेस्कॉम कार्यालयातील अधिकाऱयांची बोलतीच बंद झाली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुदिहाळ येथील वीज ग्राहकाने आपल्या घराला लागूनच असलेल्या जनावरांच्या गोठय़ात एक बल्ब जोडला होता. याची पाहणी चिकोडी येथील भरारी पथकाने करताना काहीही न सांगता ते निघून गेले. यानंतर काही दिवसांनी निपाणी हेस्कॉम कार्यालयातून अतिरिक्त वीज वापरल्याप्रकरणी दंडात्मक कारवाईची नोटीस दिली. 12 हजार 100 रुपयांची दंडात्मक कारवाई पाहून वीज ग्राहक अवाक झाला. त्याने नोटीस निरखून पाहिले असता एक हा आकडा वाढवून 2100 रुपयांचा दंड 12 हजार 100 रुपये केल्याचे स्पष्ट झाले.
अंकात फेरबदल करताना नोटीसीमध्ये एक ठिकाणी मात्र 2100 रुपये दंडाची रक्कम तशीच राहिली होती. हा प्रकार पुढे आला असताना काही हेस्कॉम कर्मचाऱयांनी आपण मध्यस्थी करून निम्म्यावर मिटवू, असेही वीज ग्राहकाला सांगितले. यातून वरकमाईचा फंडा उघड होत गेला. यानंतर संबंधित वीज ग्राहकाने हेस्कॉम कार्यालय गाठताना अधिकाऱयांची भेट घेतली. के. जी. पिरजादे या महसूल अधिकाऱयाने नोटीस द्या, आपण चिकोडी व बेळगाव येथील अधिकाऱयांना भेटून दंड कमी करून आणतो. फक्त त्यासाठी चहा-पाण्यासाठी म्हणून काहीतरी द्यावे लागेल, असे सांगितले.
बुधवारी पिरजादे यांनी वीज ग्राहकाला फोन करून मी अधिकाऱयांना विनवण्या करून दंड कमी केला आहे. तुम्ही प्रत्यक्ष भेटायला या, असे सांगितले. यानंतर गुरुवारी वीज ग्राहकाने कार्यालयात जाऊन पिरजादे यांची भेट घेतली. यावेळी पिरजादे यांनी 2200 रुपये भरा, असे सांगत हाती चिठ्ठी दिली. याचबरोबर जर दिलेल्या नोटीसीची मोबाईलमध्ये फोटोप्रत असेल तर डिलीट मारा, असा अजब सल्ला देण्याची किमया साधली. या सर्व प्रकारानंतर वीज ग्राहकाने सत्य प्रकार पुढे आणला. यावर उपस्थित सर्वच अधिकाऱयांची बोलतीच बंद झाली. सुज्ञपणे नोटीस पाहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. असे अनेक ग्राहकांबाबतीत प्रकार घडल्याचा संशय व्यक्त होत असून संबंधित अधिकाऱयांवर कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.
सत्य समोर येऊनही…
दंड आकारणीच्या फेरबदलाचा व सेटलमेंटचा सर्व प्रकार उघडकीस आला असताना के. जी. पिरजादे हे आपणच बरोबर आहोत, असे सांगत होते. काही अधिकारी चुकीची स्थिती समजून सांगत असतानाही दुर्लक्ष करताना काय करायचे ते करा, असे उर्मटपणे बोलत होते.









