थिवीत 42 हजार मद्याच्या बाटल्या जप्त
प्रतिनिधी/ पणजी, वास्को
वजनमाप खात्याने काल शुक्रवारी विविध ठिकठिकाणी छापे टाकून सुमारे 1 कोटी 73 लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. झुवारीनगर व उपासनगर येथे तीन, थिवी येथे एक मिळून चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून घेतला आहे.
थिवी औद्योगिक वसाहतीतील एका आस्थापनात 42 हजार मद्याच्या बाटल्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. त्याची किंमत 1 कोटी 51 लाख रुपये असल्याची माहिती वजनमाप खात्यातील अधिकाऱयांनी दिली.
बाटल्यांमध्ये मद्य होते कमी
प्रत्येक बाटलीत 4.5 एमएल मद्य कमी आढळल्याने सदर कारवाई करण्यात आली. या खात्यातील अधिकारी गुलाम गुलबर्ग आणि निरीक्षक नितीन पांडुरंग पुरुषन यांनी सदर कारवाई केली. साहाय्यक नियंत्रक अरुण पंचवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसाद शिरोडकर, सुधीर गांवकर, पास्कॉल वाझ आणि गुरुनाथ नाईक यांनी सदर छापा टाकला होता, अशी माहिती या सूत्रांनी दिली.
वास्को व मडगाव कार्यालयाच्या वजन-माप खात्याच्या अधिकाऱयांनी झुआरीनगर व उपासनगर या जुळय़ा भागात काल शुक्रवारी छापा घालून सुमारे 22 लाखांचा अवैध माल जप्त केला आहे. यात मद्य व ट्रकांच्या सुटय़ा भागांचा समावेश आहे.
झुआरीनगरात 4200 बाटल्या मद्य जप्त
झुआरीनगरातील सांकवाळ औद्योगिक वसाहतीतील एका आस्थापनावर छापा टाकून या अधिकाऱयांनी 75 मिली लिटरच्या 4200 रम मद्याच्या बॉटल्स जप्त केल्या आहेत. या मद्यसाठय़ाची किंमत 21 लाख 50 हजार रूपये आहे. या बॉटल्समध्ये 20 मिली लिटर मद्य कमी भरण्यात आल्याचे आढळून आले होते. त्यामुळे हा माल अधिकाऱयांनी जप्त केला.
उपासनगरात ट्रकांचे सुटे भाग जप्त
उपासनगर सांकवाळ या भागातील मेटा स्ट्रिप कॉम्प्लॅक्स येथेही छापा टाकून या अधिकाऱयांनी 22 हजार रूपये किंमतीचे ट्रकांचे सुटे भाग जप्त केले. या सुटय़ा भागांच्या पॅकवर उत्पादनाची तारीख नव्हती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. झुआरीनगर व उपासनगर या भागात आणखी तीन ठिकाणी कारवाई करण्यात आली. या भागातील काही व्यवसायांच्या ठिकाणी अनधिकृत वजन काटे आढळून आले आहेत. अधिकाऱयांनी हे साहित्य जप्त केले आहे.
ही कारवाई वास्कोतील वजन माप खात्याचे निरीक्षक नितीन पांडुरंग पुरूषन व मडगाव कार्यालयाचे निरीक्षक देमू मापारी यांनी खात्याच्या इतर कर्मचाऱयांच्या सहकार्याने केली.









