वार्ताहर/ कोगनोळी
रस्त्यावर थांबलेल्या उसाने भरलेल्या ट्रॉलीला पाठीमागून मोटरसायकलस्वाराने जोरदार धडक दिल्याने वृद्ध गंभीर जखमी झाला. त्यांना दवाखान्यात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास आप्पाचीवाडीनजीक घडला. अशोक गणपती पाटील (वय 60 रा. म्हाकवे ता. कागल) असे मृताचे नाव आहे. तर पत्नी व त्यांचा नातू जखमी आहेत. पत्नी विमल पाटील यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, अशोक पाटील हे आपली पत्नी, नातू प्रेम यांच्यासह आप्पाचीवाडी येथे मोटरसायकल (क्र. एमएच 09 डी.एस. 9737) ने चालले होते. म्हाकवे-आप्पाचीवाडी मार्गावर उसाची भरलेली ट्रॉली (क्र. केए 23 टी 4902) लावली होती. रात्रीच्या अंधारात अशोक पाटील यांना समोरचे वाहन दिसले नाही. त्यामुळे ते थांबलेल्या ट्रॉलीवर जावून आदळले. यात त्यांच्या चेहऱयामध्ये ऊस घुसले होते. त्यांच्या पत्नी विमल व नातू प्रेम हेही जखमी झाले आहेत. त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले असून विमल यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
दरम्यान रात्री उशीरा अशोक पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून असा परिवार आहे. ऊस हंगामात ट्रक्टर ट्रॉली रस्त्यानजीक थांबविण्यात येतात. यामुळे सदर वाहन रात्रीच्या वेळी दिसत नसल्याने अशा दुर्घटना घडत आहेत. तरी याची दखल घेत रस्त्याकडेला वाहने उभी करु नयेत, अशी मागणी होत आहे.









