थलैवाजच्या विजयात अजिंक्य पवारचा महत्त्वाचा वाटा, पाटणातर्फे मोनू गोयतचा दमदार खेळ
बेंगळूर / वृत्तसंस्था
बदली खेळाडू या नात्याने मैदानात उतरत धुमाकूळ घातलेल्या अजिंक्य पवारच्या बहारदार खेळीमुळे तमिळ थलैवाजने पुणेरी पलटणला 36-26 अशा फरकाने नमवत प्रो कबड्डी लीगच्या या हंगामातील आपला पहिला विजय नोंदवला तर अन्य एका लढतीत पाटणा पायरेट्सने बंगाल वॉरियर्सचा 44-30 असा धुव्वा उडवला, त्यात मोनू गोयतचा वाटा मोलाचा राहिला.
तमिळ थलैवाजच्या अजिंक्य पवारने 11 रेडमध्ये 11 गुण संपादन केले आणि याचमुळे थलैवाजला 36-26 असा सहज विजय मिळवता आला. अजिंक्यने रेडमध्ये प्रतिस्पर्धी बचावपटूंना सहज भेदले आणि पाहता पाहता तो संघाचा डू ऑर डाय रेड स्पेशालिस्ट बनला. प्रारंभी शोमन राहुल चौधरीने साहिल सिंगला लगाम घातला आणि तमिळने दमदार सुरुवात केली. मनजीतने त्याच्या रेडमध्ये बोनस गुण घेतला, ही बाबही त्यांच्या पथ्यावर पडली.
मनजीत प्रारंभी रेड हॉट फॉर्ममध्ये होता. त्याने एका रेडमध्ये पुणेरी पलटणच्या 3 बचावपटूंना लक्ष्य केले आणि संघाला 9-2 अशी आघाडी मिळवून दिली. तमिळने याप्रकारे वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर प्रतिस्पर्धी संघ ऑलआऊट होणे साहजिक होते. यामुळे त्यांची आघाडी 12-3 अशी भक्कम झाली.
पुणेरी पलटणने नंतर आपल्या रणनीतीत बदल केला. पुण्याचे बचावपटू अबिनेशनंदराजन व विशाल भारद्वाज यांनी आपला खेळ विशेष उंचावला. मनजीतचा खेळ थोडासा मंदावल्यानंतर याचाही पलटणने उत्तम लाभ घेतला. मध्यंतरासाठी खेळ थांबला, त्यावेळी त्यांनी थलैवाजची आघाडी 11-18 अशा 7 गुणांपर्यंत आणली होती.
दुसऱया सत्रात पुणेरी पलटणने आक्रमक सुरुवात केली आणि यामुळे तमिळला भक्कम आघाडीवर पाणी सोडावे लागले. पंकज मोहितेचा अचानक वेगवान, धारदार खेळ अनेक समीकरणे बदलून जाणारा ठरला. त्यानंतर अजिंक्य पवारने उत्तम चाली रचत नव्याने आघाडी मिळवून दिली आणि हा सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला.
पाटणाचा एकतर्फी विजय
या स्पर्धेतील अन्य एका लढतीत मोनू गोयतच्या बहारदार खेळीमुळे पाटणा पायरेट्सने विद्यमान विजेत्या बंगाल वॉरियर्सला 44-30 फरकाने पराभवाचा धक्का दिला. या विजयासह पाटणा संघाने गुणतालिकेत दुसऱया स्थानी झेप घेतली. सचिन व प्रशांत कुमारच्या दमदार खेळामुळे पाटणा पायरेट्सने उत्तम रेड पॉईंट्स मिळवले. मात्र, स्टार रायडर मनिंदर सिंगसारखा प्रतिस्पर्धी उत्तम बहरात असल्याने त्यांना बरेच प्रयास करावे लागतील, हे स्पष्ट होते.
मनिंदर सिंगने एकाच रेडमध्ये मनू गोयत व चियानेहला बाद करत संघाला 11-9 अशी आघाडी मिळवून दिली होती. नंतर त्याने प्रशांत कुमारला देखील पुढील रेडमध्ये बाद केले. बंगालकडे यावेळी 4 गुणांची आघाडी होती.
पाटणा पायरेट्सचा खेळ यानंतर अचानक मंदावला आणि बंगालने 16-10 अशी उत्तम आघाडी प्राप्त केली. मनिंदरने सुपर-10 नोंदवत चियानेहला बाद केले. त्यानंतर सचिन व मनू गोयत यांनी पाटणाला विजयाच्या ट्रकवर आणण्यासाठी अनुभव पणाला लावला. मध्यंतराला बंगालकडे 21-16 अशी आघाडी होती.
दुसऱया सत्रात बंगालने बचाव भक्कम केला आणि याचा त्यांना लाभ झाला. मोनू गोयतने यादरम्यान 500 वा रेड गुण मिळवला. नीरज कुमारने देखील उत्तम बचाव साकारला आणि एकदा रिशांक देवाडिगाला जेरीस आणले. मनिंदरचे अपयश त्यानंतर बंगालला बरेच भोवले. सचिनने बंगालच्या दोन डिफेंडर्सना बाद केल्यानंतर पाटणाने 4 गुणांची आघाडी घेतली. पुढे, मोनूची 7 गुणांची रेड सनसनाटी ठरली. मोनूने यादरम्यान सुपर-10 नोंदवले. अंतिमतः पाटणाने सहज विजयावर शिक्कामोर्तब केले.









